
स्थैर्य, फलटण, दि. ०९ सप्टेंबर : शिक्षण, समाजसेवा, क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रातील अतुलनीय योगदानाबद्दल, उत्तरेश्वर हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, विडणी येथे कार्यरत असलेले श्री. काशिनाथ सोनवलकर यांना महात्मा फुले एज्युकेशन सोसायटी, विडणी यांच्यातर्फे ‘आदर्श शिक्षक सन्मान पुरस्कार २०२५’ देऊन गौरविण्यात आले. फलटण-कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार दिपकराव चव्हाण आणि श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. बाळासाहेब शेंडे यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
श्री. सोनवलकर यांनी आपल्या प्रदीर्घ कार्यकाळात कमला निंबकर बालभवन, फलटण येथे क्रीडाशिक्षक आणि इतिहास शिक्षक म्हणून सेवा बजावली आहे. यासोबतच त्यांनी विविध शिक्षण संस्थांमध्येही कार्य केले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विद्यार्थी क्रीडा आणि अभ्यासात चमकले आहेत. विशेषतः स्काऊटच्या माध्यमातून त्यांचे जवळपास तीनशे विद्यार्थी राज्य पुरस्कार प्राप्त झाले आहेत.
पुरस्कार स्वीकारताना आपल्या भावना व्यक्त करताना सोनवलकर म्हणाले, “या पुरस्काराचे श्रेय माझ्या गुरुवर्य डॉ. मॅक्सिन बर्नसन आणि डॉ. मंजिरी निंबकर यांना जाते. त्यांच्याकडूनच मला अध्यापनाचे बाळकडू मिळाले. हा माझ्या कर्मभूमीतील पुरस्कार असल्याने तो स्वीकारताना विशेष आनंद होत आहे.” त्यांनी या प्रवासात सहकार्य करणाऱ्या शिक्षक सहकाऱ्यांचे व कुटुंबीयांचेही आभार मानले.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष हणमंतराव अभंग, उपाध्यक्षा डॉ. सौ. सुचिता शेंडे, सचिव राजू पवार, माजी प्राचार्य रामदास अभंग यांच्यासह संस्थेच्या विश्वस्त मंडळाने श्री. सोनवलकर यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. त्यांच्या या यशाबद्दल विविध क्षेत्रांतील मान्यवरांकडून त्यांचे अभिनंदन होत आहे.