राष्ट्रीय समाज पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी काशिनाथ शेवते

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि.२७ जानेवारी २०२२ । फलटण । क्रांतिवीर संगोळी रायान्ना जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष व माजी मंत्री महादेवराव जानकर यांनी रासपचे ज्येष्ठ नेते काशिनाथ शेवते यांची राष्ट्रीय समाज पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड केली आहे.

काशिनाथ शेवते यांना कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना ते मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंबातून येत असल्यामुळे त्यांच्या या निवडीला विशेष महत्त्व प्राप्त होत आहे. शेतकरी कुटुंबातील प्रथमच कोणा व्यक्तीला एवढ्या मोठ्या पदावर काम करण्याची संधी मिळाली असल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये आहे. सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील जावली हे शेवते यांचे गाव असून कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना ते गेली तीस वर्षे यशवंत सेनेच्या स्थापनेपासून माजी मंत्री व आमदार महादेव जानकर यांच्या सोबत मोठ्या निष्ठेने राहिले आहेत. अनेक मातब्बर पदाधिकाऱ्यांनी रासपची साथ सोडल्यानंतरही शेवते हे प्रामाणिकपणे जानकर यांच्यासोबत राहिले आहेत.

दिवसेंदिवस पक्षातील त्यांचे महत्व वाढत गेले असून सबंध महाराष्ट्रभर शेवते यांचा मोठा संपर्क आहे. साधी राहणी उच्च विचारसरणी असा त्यांचा पेहराव असतो. याअगोदर त्यांनी जावली गावचे सरपंच, सातारा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य म्हणून काम पाहिले आहे. 2017 साली झालेल्या पंचायत समिती निवडणुकीतही त्यांनी नशीब आजमावले होते.सर्वसामान्य कार्यकर्त्यांशी बोलतानाही ते अत्यंत आदराने बोलतात यामुळेच समाजात त्यांना मानणारा खूप मोठा वर्ग निर्माण झाला आहे.

काशिनाथ शेवते यांच्या अगोदर राष्ट्रीय समाज पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी आमदार रत्नाकर गुट्टे, श्रीगोंदा बाजार समितीचे सभापती बाळासाहेब नाहाटा यांच्यासारख्या मोठ्या व्यक्तींनी काम केल्यामुळे या पदाला विशेष महत्त्व आहे. प्रदेशाध्यक्ष पदावरील निवडीनंतर काशिनाथ शेवते यांच्या कष्टाचे चीज झाले असल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये आहे. शेवते यांच्या निवडीबद्दल राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी मंत्री महादेव जानकर, आमदार रत्नाकर गुट्टे, बाळासाहेब दोडतले, माऊली सलगर, भाऊसाहेब वाघ, मामुशेठ वीरकर, वैशाली वीरकर, बबनदादा वीरकर, खंडेराव सरक, पूजाताई घाडगे, श्रीकांत देवकर, रमेश चव्हाण, शेखर खरात, संतोष ठोंबरे, निलेश लांडगे यासह राज्यभरातील मान्यवरांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

काशिनाथ शेवते यांची पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यामुळे महाराष्ट्रातील सर्वसामान्य व युवा कार्यकर्ता अतिशय आनंदी असल्याच्या भावना शेवते यांचे कट्टर समर्थक श्रेयस गोफणे यांनी आमच्याशी बोलताना व्यक्त केल्या.


Back to top button
Don`t copy text!