स्थैर्य, नागठाणे, दि. २७ : सध्या कोविडमुळे ताबडतोब बेडची गरज निर्माण झाली आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी व आमच्या सर्वांच्या चर्चेतून येथील काशीळ ग्रामीण रुग्णालयाच्या वास्तू विचार केला आहे. या भव्य वास्तूमध्ये आयसीयूचे 50 बेड बसू शकतील. पुढील आठ दिवसात काम पुर्ण होईल असे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.
काशीळ (ता. सातारा) येथील नव्याने उभारणी सुरू असलेल्या ग्रामीण रूग्णालय कोविडच्या रूग्णासाठी वापरता येईल का यासाठी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पाहणी केली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी शेखर सिंह, जिल्हा शल्यचिकित्सक अमोद गडीकर, मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत, कार्यकारी अभियंता श्री. दराडे, प्रातांधिकारी मिनाज मुल्ला, सामाजिक कार्यकर्ते भरत माने, सरपंच सुभाषराव जाधव, उपसरपंच कामिनी तळेकर, माजी पंचायत समिती सदस्य जयवंत कुंभार, चंद्रकांत जगताप, माजी सरपंच अंकुश माने, प्रकाश जाधव, धनाजी माने, सुरेश माने आदी मान्यवर उपस्थित होते. आमदार चव्हाण पुढे म्हणाले, सर्वसोयी सुविधायुक्त रूग्णालय व्हावे अशी मागणी या परिसरातील अनेक गावातील लोकांची होती. त्यानूसार येथे ग्रामीण रूग्णालय मंजूर केले. या रूग्णालयास उभारणीसाठी पाच वर्ष होऊन गेले असून बांधकाम अंतिम टप्यात आहे. या वास्तूसाठी गावकऱ्यांचे तसेच अनेक विभागाचे सहकार्य मिळाले आहे. सध्या कोविड बाधितांची संख्या वाढत असल्याने अतिरिक्त बेडची गरज निर्माण झाली असल्याने या इमारतीचा विचार केला असून पुढील आठ दिवसात आवश्यक कामे पुर्ण केली जातील. सातारा व कऱ्हाड या शहराच्या मध्यवर्ती हे रूग्णालय असल्याने या काशीळ ग्रामीण रूग्णालया बरोबरच ट्रामा सेंटर व कर्मचारी निवास ही इथे उभारली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी रूग्णालय आवारात मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपन करण्यात आले.