दैनिक स्थैर्य । दि. ०५ सप्टेंबर २०२२ । सातारा । ‘सर्वसाक्षी जगत्पती त्याला नकोच मध्यस्थी’ हे ब्रीद स्वीकारून क्रांतिसूर्य महात्मा फुले यांनी धार्मिक आणि सामाजिक सुधारणा हा उदात्त हेतू निच्छित करून 24 सप्टेंबर 1873 रोजी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. भारताला आधुनिक, विवेकी, चिकित्सक, संशोधनकेंद्रीत राष्ट्र बनविणे हा उदात्त हेतू त्या पाठीमागे होता. अंधश्रद्धा दूर करून विवेकी समाज निर्माण करून भारत बलशाली होईल ही त्यामागे दूरदृष्टी होती. अन्नदान यापेक्षा ज्ञानाला सर्वोच्च प्राधान्य सामाजिक न्याय, मानवता हाच धर्म, सामाजिक हक्क, विशेष हक्क, राजकीय हक्क, महिला शिक्षण, वंचित उपेक्षित घटकांचे शिक्षण, कर्तव्य, अंधश्रद्धा निर्मूलन याविषयी जागरूकता जाति व्यवस्थेचे समूळ उच्चाटन एकेश्वरवाद, मनुष्य धर्म, माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार, सर्वांना इंग्रजीसह सक्तीचे शिक्षण, शेतकर्यांची होणारी पिळवणूक थांबवणे, सक्तीने वसूल केला जाणारा शेतसारा थांबविणे, सर्व अनिष्ट रूढी, परंपरा, विचारांना विरोध करून सामाजिक व आर्थिक समता निर्माण करणे हा उदात्त हेतू सत्यशोधक समाज संघटनेच्या मागे होता.
महात्मा फुले यांच्यानंतर (1890) क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, लोकराजा राजर्षी शाहू महाराज, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर, परमपूज्य सानेगुरुजी, कर्मवीर भाऊराव पाटील यांनी सत्यशोधक समाजाचा वारसा पुढे चालविला. 1902 मध्ये राजाराम हायस्कूल कोल्हापूर येथे शिक्षण घेत असताना कर्मवीर भाऊराव पाटील यांच्यावर लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांच्या पुरोगामी विचारांचा प्रभाव
पडला महात्मा फुले यांच्या खंडातून कर्मवीर यांच्या विचारांना चालना मिळाली. एक नवी दिशा मिळाली. विज्ञाननिष्ठा, विवेक यांची शिदोरी घेऊन कर्मवीरांनी आपला प्रवास सुरू केला. यातूनच पुढे 1909 मध्ये ग्रामस्थांच्या मदतीने सांगली जिल्ह्यातील दुधगाव येथे सर्व जाति -धर्माच्या मुलांसाठी मिश्र वसतिगृहाची स्थापना केली. हा प्रयोग चांगलाच यशस्वी झाला जातिविरहित समाज रचनेवर श्रद्धा ठेवणारे कर्मवीर भाऊराव पाटील हे कृतिशील सुधारक होते.
लहानपणी विटा या सांगली येथे आपल्या सवंगड्यांसह खेळत असताना तहान लागली म्हणून शेजारी असलेल्या आडावर गेले पण स्थानिक काही लोकांनी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या मित्रांना पाणी पिण्यास मनाई केली. बंडखोर, स्पष्ट, निर्भीड, सत्याची चाड असलेले बाल कर्मवीर भाऊराव पाटील यांना तो अन्याय सहन झाला नाही. माणसामाणसातील भेदभाव त्यांना अमान्य होता. भाऊराव
यांनी आडावरचा रहाट मोडून आडात टाकला व म्हणाले, ‘आता प्या पाणी; बघतोच कसे पाणी पितात ते” यावरून भाऊरावांची अन्यायाविरुद्ध पेटून उठण्याची बंडखोर वृत्ती व मानवता हाच धर्म लहानपणापासून त्यांच्या रक्तात भिनलेला दिसून येतो.
सत्यशोधक समाज या संघटनेचे कार्य करीत असताना काही समाजकंटकांनी महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्यासाठी मारेकरी पाठविले होते तसाच प्रकार भाऊरावांच्या बाबतीत घडला खोट्या प्रकरणात यांना अडकवण्याचा प्रकार म्हणजे डांबर प्रकरण 1914 मध्ये ब्रिटिश किंग एडवर्ड 7 वे यांच्या कोल्हापूर मधील पुतळ्याला मुद्दाम कोणीतरी डांबर फासले आणि तो प्रकार सत्यशोधक समाज संघटनेचे कार्यकर्ते व माजी अर्थमंत्री अण्णासाहेब लठ्ठे यांच्या सांगण्यावरून झाला अशी खोटी साक्ष द्यावी यासाठी भाऊरावांवर दबाव टाकण्यात आला. अण्णासाहेब लठ्ठे सत्यशोधक समाजाचे खंदे समर्थक, पुरस्कर्ते आणि वंदनीय व्यक्तिमत्व होते. भाऊरावांचे ते गुरू होते. भाऊरावांनी खोटी साक्ष देणार नाही असे स्पष्ट सांगितले. आणि त्यासाठी अन्य कोणत्याही परिणामांना सामोरे जाण्याची तयारी दर्शविली. या प्रकरणात अनेक दिवस भाऊरावांना कारावास सहन करावा लागला. भाऊराव कणखर, निर्भय होते. अखेरपर्यंत ते सत्याच्या बाजूने उभे राहिले. शेवटी मातोश्री गंगाबाई यांनी राजर्षी शाहू महाराज यांची रस्त्यावर बग्गी अडवून सत्यता जाणून शिक्षा व्हावी असा आग्रह धरला व पुढे भाऊराव यांची डांबर प्रकरणातून सुटका झाली.
25 सप्टेंबर 1919 सत्यशोधक समाज संघटनेची परिषद सातारा जिल्ह्यातील काले गावी होती. केशवराव बागडे यांच्या अध्यक्षतेखाली ही परिषद पार पडली. बहुजनांचा उद्धार हाच प्रमुख उद्देश या परिषदेचा होता. यासाठी तात्विक बैठक कार्यक्रम, भविष्यातील नियोजन, अडथळे व कामाचे वाटप यासाठी ही परिषद होती या परिषदेला व केशवराव जेधे, भाई माधवराव बागल, प्रबोधनकार ठाकरे यांनी बहुजनांच्या उध्दारासाठी कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शिक्षण संस्था सुरू करावी आणि सर्व जाति -धर्माच्या मुलांना दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षणाची व्यवस्था निर्माण करावी अशा प्रकारची विनंती केली. कर्मवीरांनी ती विनंती मान्य केली. शब्द पाळला आणि 4 ऑक्टोबर 1919 रोजी रयत शिक्षण संस्थेची स्थापना सातारा जिल्ह्यातील काले या गावी केली. राजा राममोहन रॉय, महात्मा फुले यांच्या कार्यामुळेच 1913 मध्ये ईस्ट इंडिया कंपनीला भारतातील जनतेच्या शिक्षणाचा अधिकार मान्य करावा लागला. याचाच भाग म्हणून लोकमान्य टिळक, राजर्षी शाहू यांनी शिक्षण संस्था उभारणीमध्ये भाग घेतला. भाऊरावांनी 1921 मध्ये वाळवे तालुक्यातील नेर्ले या गावी वसतिगृहाची स्थापना केली. सर्व जाति-धर्माच्या मुलांना शिक्षणासाठी निवासासाठी गावोगावी वसतिगृह सुरू करण्यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न केले. 26 जानेवारी 1950 मध्ये भारतीय संविधानाची अंमलबजावणी सुरू झाली भारतीय संविधानातील कलम 21 नुसार प्रत्येक भारतीय नागरिकांना सन्मानाने जीवन जगण्याचा अधिकार आहे ही शिकवण छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, महात्मा गांधी यांच्याकडून कर्मवीरांना हे संस्कार मिळाले होते.
1924 मध्ये रयत शिक्षण संस्थेचे स्थलांतर सातारा येथे धनिणीच्या बागेत वसतिगृहाची सुरुवात झाली. ग्रामीण भागातल्या कष्टकरी, होतकरू विद्यार्थ्यांना खांद्यावर आणले. आणि शिक्षणाची सोय निर्माण केली. वेळ प्रसंगी पत्नीचा सौभाग्यलंकार गहाण टाकून वसतिगृह सुरू ठेवले व शेकडो विद्यार्थी राष्ट्राच्या सेवेसाठी तयार केले. यामध्ये क्रांतिवीर, बॅरिस्टर, माजी कुलगुरू पी.जी.पाटील, जेष्ठ स्वातंत्रसैनिक आप्पासाहेब पाटील, इस्माईलसाहेब मुल्ला, शंकरराव खरात, ज्ञानदेव धृवनाथ घोलप, लक्ष्मण भिंगारदिवे, रामभाऊ नलावडे, माजी कुलगुरू, प्राचार्य शिवाजीराव भोसले क्रांतिवीर प्रा.ग.प्र.प्रधान हे सुद्धा वसतिगृहात येत मित्रांबरोबर अभ्यास करीत, खेळत असे अनेक महनीय व्यक्तिमत्त्व या वसतिगृहातून राष्ट्राच्या सेवेसाठी बाहेर पडले व राष्ट्राच्या, समाजाच्या उद्धारासाठी अखेरपर्यंत झिजले. जांत न पूछो सज्जन की, पूछ लीजिए ज्ञान, मोल करो तलवार का, पडा रहने दोम्यान कर्मवीरांनी संत कबीरांचे हा दोहा आजीवन जपला. स्तर, भाषा, प्रदेश, धर्म याचा विचार नकरता सामान्य, होतकरू विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण व रोजगाराभिमुख शिक्षण मिळावे आणि राष्ट्राच्या सेवेसाठी जावे हा विचार त्यांनी आजीवन जपला आणि ग्रामीण भागात वसतिगृहाची व शाळा, महाविद्यालयांची सुरुवात केली. 25 फेब्रुवारी 1927 रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या शुभहस्ते श्री.छत्रपती शाहू बोर्डिंग हाउस क्रमांक -1 धनिणीची बाग, सातारा या वसतिगृहाचे नामकरण झाले. यावेळी लक्ष्मणराव बाबाजी भिंगारदिवे या विद्यार्थ्याने संस्कृत मध्ये उत्तम भाषण केले. भाषण ऐकून महात्मा गांधी यांनी स्वतःच्या गळ्यातील हार काढला आणि लक्ष्मणराव भिंगारदिवे यांच्या गळ्यात घातला. त्यावेळी वसतिगृहात 10 मराठे, 3 महार, 3 मांग, 3 चांभार, 3 मुसलमान, 2 साळी, 1 धनगर, १ सोनार, 1 होलार, 1 कोष्टी अशी सर्व जाति-धर्माची मुले एकत्र अभ्यास करतात जेवण करतात ते
पाहून महात्मा गांधी म्हणाले, ‘मी जे साबरमती आश्रमात करू शकलो नाही ते भाऊरावांनी या वसतिगृहात करून दाखवले आहे’ “उनका कार्य हि उनका सच्चा कीर्तिस्तंभ है | असे म्हणून पुढे हरिजन फंडामधून रुपये 501 रुपयाची दरवर्षी मदत सुरू केली. भाऊराव पाटील यांनी कष्टाळू, अभ्यासू, होतकरू विद्यार्थी यांना उच्च शिक्षणासाठी परदेशी पाठविले. यामध्ये मेघा कांबळे, टी.बी.आवळे, बाबासाहेब बोबडे हे अस्पृश्य समाजातील होते. अण्णांनी कधीही धर्म व जात पाहिली नाही. प्रत्येक विद्यार्थ्याला उच्च शिक्षणासाठी मदत मिळविण्यासाठी गावोगावी फिरत होते. आदरणीय आर.व्ही.खैरमोडे हे अतिशय गुणी, विचारी व अभ्यासू माजी विद्यार्थी त्यांना आष्टा येथील महात्मा गांधी विद्यालयाचे पहिले मुख्याध्यापक म्हणून संधी दिली. अस्पृष्य समाजातील असल्याने त्यालाही समाजातून विरोध झाला पण भाऊरावांनी विरोधाची तमा न बाळगता मुख्याध्यापकपदी संधी दिली. पुढे याच आर.व्ही.खैरमोडे गुरुजी यांनी महाराष्ट्राचा बुलंद आवाज, माजी मंत्री, रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन स्व.प्रा.एन.डी.पाटील यांच्यासारखे विवेकी विद्यार्थी घडविले व राष्ट्राच्या सेवेसाठी काम
करण्यास दिशा व मार्गदर्शन केले. सामाजिक दास्य, आर्थिक दास्य, राजकीय दास्य हे गुलामगिरीचे 3 प्रकार मुळापासून काढून टाकण्याचे संस्कार कर्मवीर भाऊराव पाटील यांचेकडून मिळाले. 1932 मध्ये उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी पुणे, पांडवनगर येथे ‘युनियन बोर्डींग हाऊस’ म्हणजे मिश्र वसतिगृह सुरु केले. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्यात संत
गाडगेबाबा यांचे योगदान मोठे आहे. 1954 मध्ये कराड, सातारा येथे ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षण मिळावे यासाठी महाविद्यालय सुरू केले. या महाविद्यालयासाठी पुणे येथील महात्मा फुले मंडई येथील व्यापारी व हमाल यांनी देणगी गोळा केली. यामध्ये पुण्याचे पहिले महापौर बाबुराव सणस, उद्योगपती गणपतराव शेडगे, नामदेवराव मते, रामभाऊ तुपे, जयसिंगराव ससाणे मास्तर यांची मोलाची मदत झाली. पुढे ही देणगी कराड येथील महाविद्यालयास देण्यात आली. या महाविद्यालयाचे उद्घाटक व प्रमुख पाहुणे म्हणून भाऊरावांनी संत गाडगेबाबा यांना निमंत्रित केले. संत गाडगेबाबा यांनी एक दिवस अगोदर येऊन पहाटे महाविद्यालयाचा संपूर्ण परिसर स्वतः झाडून
स्वच्छ केला आणि उद्घाटन झाले असे जाहीर केले. आज महाविद्यालय अत्याधुनिक सुविधांनी सज्ज आहे. या महाविद्यालयाचे नाव सद्गुरू गाडगे महाराज (SGM) महाविद्यालय आहे. प्रत्येक शाळेत प्रशिक्षित व गुणवत्तापूर्ण, तंत्रस्नेही शिक्षक असावेत अशी भाऊरावांची अपेक्षा होती. शिक्षक व शिक्षणाचा निरंतर गुणवत्तापूर्ण विकास करण्यासाठी 17 जुलै 1935 रोजी सिल्व्हर ज्यूबिली रुरल ट्रेनिंग कॉलेज (महात्मा फुले अध्यापक विद्यालय) खाजगी संस्थामार्फत सुरु केलेले हे महाराष्ट्रातील पहिले ट्रेनिंग कॉलेज आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक खेड्या-पाड्यात प्रशिक्षित व दर्जेदार शिक्षक मिळावे. हे कर्मवीरांचे स्वप्न होते. यासाठी जाणीवपूर्वक हे अध्यापक विद्यालय कर्मवीरांनी सुरु केले. कृष्णाजी दिक्षित हे पहिले प्राचार्य कर्मवीरांनी त्यांचीही जात पहिली नाही उत्तम प्रशासकीय क्षमता, झोकून देऊन काम करण्याची तयारी, विवेक यालाच प्राधन्य दिले. आजही या अध्यापक विद्यालयात भविष्याचे वेध घेणारे, भविष्यातील भारतासाठी सक्षम, जागतिक स्पर्धेत उच्च दर्जाची कामगिरी करणारे, आव्हाने पेलणारे, स्वच्छतेपासून आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करणारे, उत्तम जीवन
जगता येणारे विद्यार्थी कसे निर्माण करावेत तसेच उच्च दर्जाच्या प्रशासकीय क्षमता विकसित करण्यासाठी सेवेत असणारे शिक्षक व प्रशिक्षणार्थी यांना सातत्याने ट्रेनिंग, मार्गदर्शन करून राष्ट्राच्या बौद्धिक व सामाजिक विकासात योगदान देत आहे. Society can not progress unless womens are educated. हा सावित्रीबाईंचा विचार भाऊरावांनी आजीवन जपला. भारतीय बौद्ध महासभा शाखा, पुणे चे अध्यक्ष एम.के.मोरे यांना 14 एप्रिल 1959 ला भाऊराव पाटील यांनी लिहिलेल्या पत्रात मुलींच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मातोश्री भिमाबाई आंबेडकर यांच्या नावाने संस्थेने मुलींसाठी विद्यालय सुरू करण्याचे ठरविले. पुढे 1960 मध्ये भीमाबाई आंबेडकर कन्या विद्यालय, कर्मवीर समाधी परिसर, सातारा येथे संस्थेने सुरु करून कर्मवीरांची इच्छा पूर्णत्वास नेली. स्वतःचे चिरंजीव आप्पासाहेब भाऊराव पाटील व सुशिलाबाई आप्पासाहेब पाटील यांच्या विवाहाच्यावेळी (10 मार्च 1943) सर्व दागिने, भेट वस्तू 1942 मध्ये मुलींसाठी सुरु केलेल्या जिजामाता अध्यापिका विद्यालय सुरू केले. लग्नात कोल्हापूरच्या महाराणी ताराबाईसाहेब या स्वतः उपस्थित राहून दिलेले राणीछाप चांदीचे 500 रुपयांनी भरलेले ताट भेट दिले व इतर आहेराचे 1000 रुपये अशी सर्व रक्कम जिजामाता अध्यापिका विद्यालयाच्या सुविधांसाठी सुपूर्द केले. आज देशात 50 % क्षेत्र हे पडीक आहे. आज भारताची लोकसंख्या 130 कोटीच्यापुढे आहे जगातील एकूण लोकसंख्येच्या 17 ते 18 टक्के लोकसंख्या ही भारतातील दिसून येते. अशावेळी नापीक जमिनीवर घरे बांधावीत, शेत जमिनीवर घरे आणि इमारती बांधू नयेत अशा सूचना तत्कालीन सरकारला केल्या. रयत शिक्षण संस्थेला जमीन देणगी देत असताना कर्मवीरांनी नेहमी पडीक जमिनी स्वीकारल्या. यासाठी “Give me waste land, we will turn into best land.” याचा आग्रह धरला. देवापुर तालुका माण, सातारा येथे माळरानावर ग्रामस्थांच्या मदतीने शंभर एकर जमीन दीर्घ मुदतीच्या
कराराने घेतली. जमीन पिकाऊ होण्यासाठी राजेवाडी तलावातील गाळ वाहून नेण्याची परवानगी 21 ऑगस्ट 1956 मे. सब.डिव्हिजनल ऑफिसर, पंढरपूर इरिगेशन यांना लिहिलेल्या पत्रात एकराला 100 गाड्या अशा 1 लाख गाड्या गाळ उपसण्यासाठी परवानगी घेतल्याची दिसून येते. शाश्वत विकासाबरोबर विज्ञानाशिवाय शेती नाही या शास्त्रीय दृष्टीकोनाबरोबर आधुनिक नाविन्यपूर्ण बदल, पाण्याचे व पिकांचे व्यवस्थापन, मानवाच्या गरजा लक्षात घेऊन शेती केली तर शेतकरी टिकेल, सुखी होईल याबाबत भाऊरावांनी नेहमी मार्गदर्शन केले. भाऊराव यांचे कार्य सामाजिक सुधारणा त्याचबरोबर आर्थिक स्तर उंचाविणे, शाश्वत विकास हा त्यामागचा उदेश्य होता. भाऊराव पाटील यांनी आणि गावांमध्ये शाळा सुरू करत असताना जाणीवपूर्वक स्मशानभूमी जवळची जागा निवडत असत. पडीक जमिनीचा विकास करण्यासाठी पसंती दिली. पडीक जमिनी स्वीकारल्या अंधश्रद्धा निर्मूलन, विवेक, वैज्ञानिक दृष्टी, श्रमप्रतिष्ठा ही मूल्ये खऱ्या अर्थाने कर्मवीरांनी दिली. नवीन शाळा सुरू करत असताना कधीही मुहूर्त बघितला नाही, तिथी बघितल्या नाही, राशी पाहिल्या नाही ते सच्चे कृतिशील आणि पुरोगामी सुधारक, शिक्षणतज्ज्ञ व शेतीतज्ज्ञ होते. या सामाजिक व शैक्षणिक कार्यात कर्मवीरांच्या सहचारिणी सौ.लक्ष्मीवहिनी यांचे योगदान आभाळाएवढे मोठे आहे कर्मवीर घरी नसताना सर्व जाति-धर्माच्या मुलांची सेवा केली. नेटकेपणाने
जबाबदारी पार पाडली. पतीच्या कार्यात तन-मन-धनाने साथ दिली. शेकडो तोळे सोने या मुलांच्या शिक्षणासाठी आणि वसतिगृहासाठी मोडून टाकले. शेवटी सौभाग्यालंकार सुद्धा गहाण ठेवावे लागले. सौभाग्यालंकार वसतिगृहाचा सचिव आप्पालाल शेख याच्या हातात ठेवताना आप्पालाल ते मंगळसूत्र घेण्यास तयार नव्हते त्यावेळी त्या म्हणाल्या.” माझा पती एवढा कर्तबगार असताना मला या
मंगळसूत्राची गरजच काय? भारतमाता सौ.लक्ष्मीवहिनी या खऱ्या अर्थाने सत्यशोधक होत्या. 27 नोव्हेंबर 1948 च्या एका कार्यक्रमात कर्मवीर भाऊराव पाटील म्हणाले सर्वांच्या ऋणातून मुक्त झालो पण माझ्या पत्नीचा ऋणातून मला मुक्त होता आले नाही. दिनदुबळ्या, वंचित, उपेक्षित घटकांची सेवा, शिक्षणाचे कार्य त्यांनी आजन्म केले. आज रयत शिक्षण संस्थेच्या महाराष्ट्र व कर्नाटकसह 16 जिल्ह्यात 776 शाखा कार्यरत आहे. सुरुवातीला 4 विद्यार्थी आज 4,42,011 विद्याथी वटवृक्षाच्या सावलीत ज्ञानसाधना करीत आहे. कर्मवीरांची हीच दूरदृष्टी होती. चालू वर्षी सत्यशोधक समाजाची 150 वर्षे पूर्ण होत आहे. कर्मवीरांप्रमाणे सत्यशोधक समाजाची दिंडी पुढे घेऊन जाणाऱ्या रयत शिक्षण संस्थेसह सर्व कार्यकर्ते यांना मन:पूर्वक शुभेच्छा व हृदयपूर्वक नमन!
प्रा.प्रदीप बबन हिवरकर
रयत शिक्षण संस्थेचे,
महात्मा फुले अध्यापक विद्यालय,
[email protected]
777 489 6632