जिंती येथील श्री जितोबा विद्यालयात कर्मवीर भाऊराव पाटील जयंती उत्साहात साजरी


स्थैर्य, फलटण, दि. २७ सप्टेंबर : रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक, पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांची १३८ वी जयंती रयत शिक्षण संस्थेच्या श्री जितोबा विद्यालय, जिंती (ता. फलटण) येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्ताने गावातून भव्य मिरवणूक आणि मुख्य सभेचे आयोजन करण्यात आले होते.

दिनांक २२ सप्टेंबर रोजी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक संपूर्ण जिंती गावातून ट्रॅक्टर-ट्रॉलीद्वारे काढण्यात आली. यावेळी विद्यार्थी आणि विद्यार्थिनींच्या झांज पथक व लेझीम पथकाने उपस्थितांची मने जिंकली. मिरवणुकीनंतर सर्व विद्यार्थ्यांना गोड जेवण देण्यात आले.

जयंतीनिमित्त दिनांक २४ सप्टेंबर रोजी मुख्य सभेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमासाठी रयत शिक्षण संस्थेचे सहाय्यक विभागीय अधिकारी दिनेश दाभाडे, ज्येष्ठ पत्रकार व सल्लागार समिती सदस्य रवींद्र बेडकीहाळ आणि साखरवाडीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक पवार हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्कूल कमिटीचे ज्येष्ठ सदस्य राजेंद्र दौलतराव रणवरे होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते कर्मवीर आण्णा व लक्ष्मीबाई पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

प्रमुख पाहुण्यांनी आपल्या भाषणातून कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जीवनातील विविध प्रसंग सांगून विद्यार्थ्यांना प्रेरित केले. “कर्मवीर भाऊराव पाटील आणि लक्ष्मीबाई पाटील यांचा त्याग महाराष्ट्र कधीही विसरणार नाही,” असे गौरवोद्गार मान्यवरांनी काढले. यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांना पारितोषिकेही प्रदान करण्यात आली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्येष्ठ शिक्षक ताराचंद्र आवळे यांनी केले, तर सूत्रसंचालन अंकुश सोळंकी व अर्चना सोनवलकर यांनी केले. मुख्याध्यापिका सौ. जाधव एम.डी. यांनी उपस्थितांचे आभार मानले.


Back to top button
Don`t copy text!