स्थैर्य, कराड, दि. 24 : कराड नगरपालिकेचे मुख्याधिकारी यशवंत डांगे यांची बदली झाल्यानंतर या जागी नियुक्त झालेले मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी शुक्रवारी नगरपालिकेचा पदभार स्वीकारला. पालिकेच्या पदाधिकार्यांसह कर्मचार्यांनी त्यांचे स्वागत केले. मुख्याधिकारी डाके हे भुसावळ येथे मुख्याधिकारी म्हणून यापूर्वी कार्यरत होते.
मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी सकाळी 8 वाजता कराड शहरातून फेरफटका मारून शहरामधील विविध भागांची माहिती घेतली. यावेळी त्यांच्यासमवेत आरोग्य निरीक्षक मिलिंद शिंदे होते. त्यानंतर डाके यांनी नगरपालिकेत पदभार स्वीकारला. यावेळी नगर अभियंता अशोक पवार, चंद्रकांत करळे, प्रशांत कांबळे, रवी ढोणे तसेच आरोग्य विभागाच्या कर्मचार्यांनी त्यांचे स्वागत केले. पदभार स्वीकारल्यानंतर लगेच अधिकारी व कर्मचार्यांची बैठक घेवून त्यांनी माहिती घेतली. शहराच्या परंपरेला साजेसे काम करून कराडचा नावलौकिक वाढवणार असल्याचे डाके यांनी यावेळी सांगितले.
रमाकांत डाके यांचे मूळ गाव पलूस, जि.सांगली हे असून त्यांनी 2013 ते 2016 या कालावधीत सांगोले नगरपालिका, 2016 ते 2019 पर्यंत मौदा नगरपरिषद, ता. नागपूर येथे व त्यानंतर भुसावळ, ता.जळगाव येथे काम केले आहे.