स्थैर्य, कराड, (प्रमोद गरगटे) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर येणार्या गणपती उत्सवामधिल नियोजनाबाबत यशवंतराव चव्हाण स्मृतीसदन येथे शासकिय अधिकारी तहसिलदार अमरदिप वाकडे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी.आर.पाटील मुख्याधिकारी यशवंत डांगे व नगराध्यक्षा सौ.रोहीणी शिंदे यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न झाली.
मार्च पासून आत्तापर्यंत कोरोनाची वाढती कमान व शिथील होत असलेला लोकडाऊन या मधून पुढील काळातील येणारी आव्हाने व त्यातच येणारा गणेश उत्सव या संदर्भात विचार करण्यासाठी नगरसेवक, गणेश मुर्ती करणारे कारागीर कुंभार समाज, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार उपस्थित होते.
गणेश उत्सवाबाबत शासनाने अजून कोणतेही निर्देश दिलेले नसून हा गणेशउत्सव सर्वानुमते पोलीस,नगरपालिका प्रशासनाबरोबर गणेश मंडळे व नागरिकांनी एकमेकांशी समन्वय ठेवून प्रशासनावर कोणताही ताण पडू नये अशा हिताचा निर्णय घेण्यात आला.
मंडळाची गणेशमुर्ती 3 फूटापर्यंत असावी असा गणेश मंडळानी स्ययंस्फूर्तीने निर्णय घेवून महाराष्ट्रात एक वेगळा आदर्श कराड पॅटर्न म्हणून निर्माण करावा.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कमीतकमी उंचीच्या मुर्ती तयार कराव्यात तसेच घरगुती गणपती सुद्धा घरपोच केल्यास कुंभार वाड्यामध्ये होणारी गर्दी कमी होवू शकेल यासाठी विचार व्हावा.
या बैठकीमध्ये कुंभार समाजाच्या कांही अडचणी व सूचना या बाबत चर्चा होवून लवकरच योग्य तो निर्णय घेवू असे मुख्याधिकारी यशवंत डांगे यांनी सांगितले.
तहसिलदार अमरदीप वाकडे यांनी कोरोना दरम्यान सर्व मोठे सण उत्सव अत्यंत साध्या पद्धतीने साजरे झाले तसेच महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात होणारी आषाढी वारीसुद्धा होणार नसल्याचे सांगितले.
मंडळांनी यंदाचा गणेशउत्सव अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करावा व खर्चाची बचत करुन राहीलेली रक्कम गरजूंसाठी वापरावी . कोरोनाचा प्रादूर्भाव वाढल्यास कांही भागात कंन्टेन्मेंट झोन करावे लागतील तेव्हा एखादवेळेस मिरवणूकीचा मार्ग बदलावा लागेल या गोष्टींचा मंडळांनी विचार करुन लहान गणेश मुर्ती बसवाव्यात असे सर्वानुमते ठरले .
नगरसेवक विजय वाटेगांवकर, आण्णा पावसकर, राजेंद्रसिंह यादव, इ.नगरसेवक अंजली कुंभार तसेच सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार, गणेश मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते यांनी चर्चेत विशेष सहभाग घेवून विचारांची देवाण घेवाण केली व त्यातून प्रशासनावर कोणताही भार न टाकता यंदाचा गणेश उत्सव वेगळा व सर्वोत्तम कराड पॅटर्न ठरावा व महाराष्ट्रात एक आदर्श घडवावा असे मत नगराध्यक्षा सौ. रोहीणी शिंदे यांनी व्यक्त केले.