
दैनिक स्थैर्य | दि. ११ जुलै २०२३ | कराड |
शिंदे मळा (कराड) येथील डॉक्टरच्या बंगल्यावर दरोडा टाकून सुमारे ४६ लाख २० हजारांचा ऐवज लंपास करणारे दरोडेखोर कारमधून पळून गेल्याची माहिती पोलिसांच्या तपासातून समोर आली आहे. या दरोडा प्रकरणाची तपासासाठी पोलिसांची वेगवेगळी पाच पथके तयार करून पुणे, मुंबईसह परराज्यात रवाना केली आहेत. दरोडेखोरांनी पोलिसांसमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे.
कराडमधील शिंदे मळा येथे डॉ. राजेश शिंदे व त्यांच्या पत्नी पूजा शिंदे हे इतर डॉक्टर व कर्मचार्यांच्या मदतीने होलिस्टींग हिलिंग सेंटर चालवतात. तेथेच बाजूला त्यांचा बंगला आहे. त्या बंगल्यात सोमवारी पहाटे ३.०० वाजण्याच्या सुमारास दरोडेखोरांनी शस्त्रांसह घुसून धाक दाखवून सुमारे २७ लाखांची रोकड व ४८ तोळे सोन्याचे दागिने असा सुमारे ४६ लाख २० हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. या घटनेची माहिती मिळतच पोलिसांनी शहर व परिसरात नाकाबंदी करून दरोडेखोरांचा तपास करण्याचा प्रयत्न केला. तरीही दरोडेखोर पळून गेले. अप्पर पोलीस अधीक्षक बापू बांगर, पोलीस उपाधीक्षक अमोल ठाकूर, पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. हे दरोडेखोर इको कारमधून घटनास्थळावरूनच पलायन केल्याचे स्पष्ट झाले आहे. दरोडेखोर कारमधून जुन्या कोयना पुलावरून वारुंजी फाटा येथून पाटण रस्त्याला गेल्याचे पोलिसांनी विविध ठिकाणी तपासलेल्या सीसीटीव्हीच्या माध्यमातून स्पष्ट झाले आहे. त्यानंतर पाटणपर्यंत सीसीटीव्हीमध्ये ती कार दिसत असल्याचे समोर येत आहे. त्या अनुषंगाने दरोडेखोर पाटण, कोयनानगर मार्गे कोकणातून मुंबईकडे गेले असण्याचा अंदाज व्यक्त करत पोलिसांची पदके मुंबई, पुणेकडे तपासासाठी रवाना केली आहेत.