
कराड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून (RTO) चारचाकी वाहनांसाठी MH 50 AA ही नवीन मालिका १५ एप्रिलपासून सुरू होत आहे. वाहनधारकांना शासकीय शुल्क भरून आकर्षक क्रमांक आरक्षित करता येतील.
स्थैर्य, सातारा, दि. ९ एप्रिल : कराड व पाटण तालुक्यातील नवीन चारचाकी वाहनांसाठी ‘MH 50 AA’ ही (०००१ ते ९९९९ क्रमांकापर्यंतची) नवीन मालिका १५ एप्रिल २०२६ रोजी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून सुरू करण्यात येत आहे. इच्छुक वाहनधारकांना या मालिकेतील आकर्षक (VIP) क्रमांक हवे असल्यास त्यांनी शासकीय नियमानुसार विहित शुल्क भरून आपले क्रमांक आरक्षित करावेत, असे आवाहन कराड उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाकडून करण्यात आले आहे.
अर्जाची वेळ आणि प्रक्रिया
१५ एप्रिल २०२६ रोजी चारचाकी वाहनांचे आकर्षक क्रमांकासाठीचे अर्ज सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत धनाकर्षासह (Demand Draft) स्वीकारले जातील. ज्या आकर्षक क्रमांकासाठी केवळ एकच अर्ज प्राप्त झाला असेल, त्या अर्जदारास त्याच दिवशी तो पसंतीचा नोंदणी क्रमांक दिला जाईल.
एकाच क्रमांकासाठी अनेक अर्ज आल्यास काय?
जर एकाच क्रमांकासाठी एकापेक्षा अधिक अर्जदारांनी मागणी केली असेल, तर अशा वेळी लिलाव प्रक्रिया राबवली जाईल. अशा प्रकरणात अर्जदारास कार्यालयीन कामकाजाच्या दुसऱ्या दिवशी दुपारी २ वाजेपर्यंत निर्धारित फीपेक्षा जास्त रकमेचा धनाकर्ष बंद लिफाफ्यात सादर करणे आवश्यक राहील. जो अर्जदार सर्वात जास्त रकमेचा धनाकर्ष देईल, त्याला तो पसंतीचा क्रमांक दिला जाईल. उर्वरित अर्जदारांचे धनाकर्ष त्यांना त्वरित परत केले जातील.
महत्त्वाची सूचना :
आकर्षक नोंदणी क्रमांक आरक्षित केल्यानंतर संबंधित वाहनधारकाने पुढील १८० दिवसांच्या आत आपल्या वाहनाची नोंदणी करणे कायदेशीररीत्या बंधनकारक आहे.
