
स्थैर्य, फलटण, दि. ३० ऑक्टोबर : कराड पाटण तालुका प्राथमिक शिक्षक सोसायटीच्या फलटण शाखेचे गुरुवारी (दि. ३०) उद्घाटन करण्यात आले. शिक्षक संघाचे नेते संभाजीराव थोरात, शिक्षक समितीचे नेते उदय शिंदे, गुरुजन एकता पॅनेलचे प्रमुख प्रदीप घाडगे आणि अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाचे राज्यासरचिटणीस दीपक भुजबळ यांच्यासह प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा झाला.
फलटण व खंडाळा तालुक्यात या सोसायटीचे ३०० हून अधिक सभासद असून, त्यांना कर्ज व इतर कामांसाठी ४० किलोमीटर अंतरावरील दहिवडी किंवा सातारा येथील शाखेत जावे लागत होते. सभासदांची ही गैरसोय दूर करण्यासाठी, त्यांच्या मागणीनुसार चेअरमन आनंदराव चाळके, व्हाईस चेअरमन एम.डी. दडस व संचालक मंडळाने फलटण येथे नवीन शाखेस मान्यता दिली.
यावेळी संभाजीराव थोरात म्हणाले, “फलटण तालुक्यातील संचालक प्रवीण मोरे व कार्यकर्त्यांनी सूक्ष्म नियोजन करून संस्था चांगल्या पद्धतीने चालवावी आणि ठेवी वाढवाव्यात.” प्राथमिक शिक्षक बँक आणि कराड पाटण सोसायटी, या दोन्ही संस्था व्यवस्थित चालल्या पाहिजेत. कर्ज थकीत राहणार नाही, याची सर्वांनी काळजी घ्यावी, असे मत उदय शिंदे यांनी व्यक्त केले.
प्रदीप घाडगे, दीपक भुजबळ, राजेंद्र जगताप, संतोष कोळेकर, धनंजय सोनवलकर, तुकाराम कदम, आनंद चाळके आणि एम.डी. दडस यांनीही मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमास प्राथमिक शिक्षक बँकेच्या चेअरमन पुष्पलता बोबडे, माजी चेअरमन नीशा मूळीक, राजेंद्र बोराटे, किरण यादव, माजी व्हाईस चेअरमन शशिकांत सोनवलकर, संचालक ज्ञानबा ढापरे, जिल्हा संघाचे सरचिटणीस दत्ता पाटील, कराड पाटण सोसायटीचे संचालक, केंद्रप्रमुख संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुभाष ढालपे, तसेच शिक्षक संघ, समिती, जुनी पेन्शन संघटना व विविध संघटनांचे पदाधिकारी आणि सभासद उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन गोसावी यांनी केले. एम.डी. दडस यांनी आभार मानले.
 
					 
					 
					 
					
 
					 
					 
					 
					 
					 
					