कराड पंचायत समितीच्या आवाराची उमेद कर्मचाऱ्यांनी केली स्वच्छता

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

 

कराड, दि. 7 : महात्मा गांधी यांच्या खेड्याकडे चला ही स्वयंपूर्ण खेड्याची संकल्पना राबविण्यातसाठी कार्यरत महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अर्थात ‘उमेद’ कर्मचारी यांना कोणत्याही परिस्थितीत बेरोजगार करू नये. उमेद अभियानात बाह्य संस्थेचा हस्तक्षेप होऊ नये, या मागण्यांसाठी कराड तालुक्यातील ‘उमेद’ अभियानातील महिलांनी व कर्मचार्‍यांनी गांधी जयंतीचे औचित्य साधून पंचायत समिती कार्यालयात स्वच्छता मोहीम राबवून गांधीगिरी पद्धतीने लक्षवेधी आंदोलन केले.

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान उमेद अंतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचारी पुनर्नियुक्ती अनुषंगाने 10 सप्टेंबर रोजी अभियानाचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण कुमार जैन यांनी एक पत्रक जारी केल्याने कंत्राटी पुनर्नियुक्तीची प्रक्रिया ठप्प झाली. त्यामुळे 10 सप्टेंबर किंवा त्यानंतर ज्यांचे करार संपुष्टात आले त्यांना जिल्हा अभियान कक्षाच्यावतीने कार्यमुक्त करण्यात आले. या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यातील सुमारे 10 हजार सहाय्यता समूहाच्या माध्यमातून जोडल्या गेलेल्या 1 लाख कुटुंबातील महिलांनी शासनाच्या या उमेद अभियानाचे खाजगीकरणाच्या दिशेने वाटचाल करणार्‍या निर्णयाच्या निषेधार्थ विविधस्तरावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या.

उमेद अभियानाचे कामकाज बाह्य यंत्रणेद्वारे चालविण्याची प्रक्रिया करण्यात येऊ नये. सध्या कार्यरत असलेल्या उमेदच्या कंत्राटी कर्मचार्‍यांमुळेच ग्रामीण भागातील वंचित महिला समाजाच्या मुख्य प्रवाहात आल्या आहेत. त्यांचे सामाजिक समावेशना बरोबरच आर्थिक समावेशन होऊन उपजीविकेचा मार्ग सुकर झाला आहे. ही निरंतर चालणारी प्रक्रिया यापुढेही अशीच चालू राहण्यासाठी सध्या कार्यरत असलेले सर्वच्या सर्व कंत्राटी कर्मचारी सेवेत कायम ठेवावेत. यापूर्वी पासून राबविण्यात येत असलेल्या पद्धतीनेच अभियानाचे कामकाज चालावे यासाठी पत्रव्यवहाराच्या माध्यमातून थेट राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना महिलांनी साकडे घातले. वीर सोशल माध्यमांद्वारे अनेक महिलांनी उमेद अभियान आता न्याय द्या हा हॅश टॅग ट्रेंड करत उमेद अभियान वाचवण्यासाठी व्यापक चळवळ उभी केली आहे.

दुसर्‍या बाजूला राज्यव्यापी कंत्राटी कर्मचारी कल्याण मंडळाच्या माध्यमातून 10 सप्टेंबर रोजी  मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण कुमार जैन यांचे ते परिपत्रक रद्द करून ज्यांना सेवेतून अचानकपणे कार्यमुक्त केले आहे त्यांना तत्काळ सेवेत समाविष्ट करून घ्यावे अशी मागणी करत न्यायालयाच्या माध्यमातून लढा उभारण्यात आला आहे. या पार्श्‍वभूमीवर सातारा जिल्ह्यातील उमेद अभियानातील ज्या कर्मचार्‍यांची कंत्राटी संपले आहेत त्यांना अभियानातून कार्यमुक्त करण्यात आले व 10 सप्टेंबरच्या या बहुचर्चित परिपत्रकाची प्रत्यक्ष झळ बसलेल्या कर्मचार्‍यांनी सातारा येथे धरणे आंदोलन केले. या आंदोलनात सातारा जिल्ह्यातील उमेद कंत्राटी कर्मचार्‍यांनी एक दिवसाची रजा टाकून पाठिंबा व्यक्त केला.  गेल्या काही दिवसांपासून राज्यभर उमेद कर्मचारी असहकार आंदोलनाच्या माध्यमातून शासनाचे आपल्या मागणीकडे लक्ष वेधत आहेत.

उमेद अभियानाच्या माध्य-मातून कार्यरत कर्मचार्‍यांना कोणत्याही परिस्थितीत कामावरून कमी करू नये यासाठी कराड तालुक्यातील गाव पातळीवर कार्यरत महिलांनी प्रातिनिधिक स्वरूपात उपस्थित राहून उमेद कर्मचार्‍यांच्या मदतीने पंचायत समिती  इमारतीची व आवाराची स्वच्छता करून  लक्षवेधी आंदोलन केले. प्रारंभी महिलांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन केले. त्यानंतर सर्व परिसर सोबत आणलेल्या झाडूने स्वच्छ केला. यावेळी महिलांनी उमेद करू नका नाउमेद, आम्हा महिलांची उमेद वाचवा, उमेद अभियान वाचवा गरिबी हटवा, असेल उमेदचा आधार…तर पडणार नाही सावकारकीचा भार…,10 सप्टेंबरचे अन्यायकारक परिपत्रक रद्द करा, असे फलक दाखवून कोणत्याही प्रकारची घोषणा न देता मूक पद्धतीने संपूर्ण आंदोलन पार पडले.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!