स्थैर्य, कराड, दि.२: कराड जनता सहकारी बॅंकेच्या 40 हजार ठेवीदारांसह ग्राहकांनी केवायसी व क्लेम फॉर्म जमा केले आहेत. ते फार्म जमा करण्याची अंतिम 31 डिसेंबरपर्यंतची होती. मात्र, त्यात वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे उर्वरितांनी आपली माहिती बॅंकेकडे जमा करावी, असे आवाहन अवसायक तथा उपनिबंधक मनोहर माळी यांनी दिली.
ते म्हणाले, “कराड जनता सहकारी बॅंकेच्या ठेवी परत मिळविण्यासाठी ठेवीदारांचे क्लेम फॉर्म आणि केवायसी फॉर्म भरून घेण्याची मुदत वाढविण्यात आली आहे. त्यामुळे ठेवीदारांना फॉर्म भरण्यासाठी आणखी अवधी मिळाला आहे. बॅंकेच्या 40 हजार ग्राहकांनी आपले केवायसी व क्लेम फॉर्म जमा केले आहेत. अजूनही फॉर्म जमा करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. बॅंकेच्या विविध शाखांमध्ये याबाबतचे पत्रक लावले आहे. बॅंकेच्या मुख्य कार्यालयाकडून पुढील सूचना येईपर्यंत फॉर्म भरून घेण्यात येणार आहेत.
कराड जनता बॅंकेच्या 5 लाखांच्या ठेवींना विमा संरक्षण आहे. बॅंकेचा परवाना रद्द करताना रिझर्व्ह बॅंकेने 5 लाखांच्या आतील ठेवीदारांचे पैसे परत मिळणार आहेत. त्यानुसार ठेवी विमा व पतहमी कार्पोरेशनबरोबर झालेल्या चर्चेनंतर बॅंकेतर्फे ठेवीदारांची केवायसी घेण्यात येत आहे. 15 डिसेंबरपासून प्रक्रिया सुरू झाली होती. त्यात आता आणखी दहा दिवसांची वाढ करण्यात आली आहे. अजूनही दीड लाख ग्राहकांच्या केवायसी आलेल्या नाहीत. त्याशिवाय बॅंकेचे 31 मार्च 2020 अखेरचे व 7 डिसेंबर 2020 अखेरचे ऑडिट सुरू आहे. ते ऑडिट पूर्ण होईपर्यंत केवायसी फॉर्म घेण्यास मुदत देण्यात आली आहे. फॉर्म भरल्यानंतरही पुढील प्रक्रियेस आणखी पाच ते सहा महिन्यांचा कालावधी लागणार आहे. ती प्रक्रिया ऑनलाइन होणार आहे.”