कन्यारत्न हेच खरे रत्न

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

एकदा एका गरोदर पत्नीने मोठया उत्सुकतेने आपल्या पतीला विचारले…..

“आपल्याला काय होईल, काय अपेक्षा आहे तुमची, मुलगा की मुलगी, तुम्हाला काय वाटतं ?”

त्यावर पती म्हणाला…..
“जर आपल्याला मुलगा झाला तर, मी त्याचा अभ्यास घेईन, त्याला गणितं शिकवीन, त्याच्याबरोबर मी मैदानावर खेळायला, पळायला पण जाईन, त्याला मासे पकडायला, पोहायला शिकविन अशा अनेक गोष्टी मी त्याला शिकवीन”

हसत हसत बायकोने यावर प्रतिप्रश्न केला “आणि मुलगी झाली तर?”

यावर पतीने खूप छान उत्तर दिले,
“जर आपल्याला मुलगी झाली तर मला तिला काही शिकवावेच लागणार नाही”

पत्नीने मोठया कुतूहलाने विचारले “का असे का?”

पती म्हणाला
“मुलगी म्हणजे जगातील एक अशी व्यक्ती आहे की तीच मला सगळं शिकवेल. मी कसे आणि कोणते कपडे घालावेत, मी काय खायचं, काय नाही खायचं, कसं खायचं, मी काय बोललं पाहिजे, आणि काय नाही बोलायचं, हे सारं ती मला पुन्हा एकदा शिकवेल. थोडक्यात जणू ती माझी “दुसरी आई”
होऊन माझी काळजी घेईल. मी आयुष्यात काही विशेष कर्तृत्व नाही केलं तरी मी तिच्यासाठी तिचा आदर्श हिरो असेन. एखादया गोष्टीसाठी मी जर तिला नकार दिला तर तो ही आनंदाने समजून घेईल.”

पती पुढे म्हणाला
“तिला नेहमी असे वाटत राहील की माझा नवरा माझ्या वडिलांसारखाच असला पाहिजे. मुलगी कितीही मोठी झाली तरी तिला वाटतं की माझ्या बाबांची मी छोटीशी आणि गोड बाहुलीच आहे. माझ्यासाठी ती आख्ख्या जगाशी वैर पत्करायला तयार होईल.”

यावर पत्नीने पुन्हा हसून विचारले
“म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय का, की फक्त मुलगीच ह्या सर्व गोष्टी करेल, आणि मुलगा तुमच्यासाठी काहीच करणार नाही ”

यावर नवरा समजुतीच्या स्वरात म्हणाला,
“अगं तसं नव्हे गं, कदाचित हे सगळं माझा मुलगाही माझ्यासाठी करेल, पण त्याला हे सगळं शिकावं लागेल, मुलींचं तसं नाही, मुली या जन्मतः हे सगळं शिकूनच जन्माला येतात. एक वडील म्हणून तिला माझा, आणि मला तिचा नेहमीच अभिमान वाटेल”

निराशेच्या सुरात पत्नी म्हणाली
“पण ती आपल्या सोबत आयुष्यभर थोडीच रहाणार आहे?” प्रत्येक कन्येच्या नशीबी बाप असतो, पण प्रत्येक बापाच्या नशीबी कन्या नसते

यावर आपले पाणावलेले डोळे पुसत पती म्हणला
“हो तू म्हणतीयेस ते खरंय, ती आपल्या सोबत नसेल, पण जगाच्या पाठीवर ती कुठेही गेली तरी मला काही फरक पडणार नाही कारण ती आपल्या सोबत नसली तरी, आपण मात्र नक्की तिच्या सोबत असू, “तिच्या हृदयात, तिच्या मनात, कायमचे!! अगदी तिच्या शेवटच्या श्वासा पर्यंत. कारण मुली ह्या परी सारख्या असतात, त्या जन्मभरासाठी, आपुलकी, माया आणि निस्वार्थ प्रेम घेऊनच जन्माला येतात !!!

कन्यारत्न वंशाचा दिवा

आपलाच भाग्यशाली ​– प्रा. रवींद्र कोकरे – ग्रामीण कथाकार,

श्रीमती प्रेमलाताई चव्हाण हायस्कूल व ज्युनियर कॉलेज, फलटण.
९४२१२१६८२१


Back to top button
Don`t copy text!