मायणीसह कानकात्रे, येरळवाडी, सूर्याचीवाडी तलाव क्षेत्रास लवकरच पक्षी संवर्धन राखीव क्षेत्राचा दर्जा प्राप्त होणार

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


 

स्थैर्य, मायणी, दि. २१ :  मायणी येथील ब्रिटिशकालीन तलावावर परदेशी फ्लेमिंगो व इतर पक्ष्यांचे आश्रयस्थान असल्याने मायणीसह कानकात्रे, येरळवाडी, सूर्याचीवाडी तलाव क्षेत्रास लवकरच पक्षी संवर्धन राखीव क्षेत्राचा दर्जा प्राप्त होणार असल्याची माहिती मुख्य वनसंरक्षक डॉ. व्ही. क्लेमेंट बेन यांनी दिली.

 

येथील पक्षी आश्रयस्थान येथे आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी डॉ. दिलीप येळगावकर, उपवनसंरक्षक डॉ. भारतसिंह हाडा, कोल्हापूरचे विभागीय वनाधिकारी गवते, परिसरातील नागरिक व पक्षी प्रेमी उपस्थित होते.

मायणी येथे ब्रिटिशकालीन तलाव असून 1896 च्या सुमारास डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वडील सुभेदार रामजी आंबेडकर यांच्या देखरेखीखाली या तलावाचे काम पूर्ण झालेे. या तलावातील पाणी साठ्यामुळे व बाजूच्या वनसंपदेमुळे इथे फ्लेमिंगोसह बरेच पक्षी आश्रयासाठी येतात. त्यांचे संरक्षण व संवर्धन होण्याच्या दृष्टीने सातारा येथील मानद वन्यजीव रक्षक सुनील भोईटे यांच्या प्रयत्नाने प्रस्ताव सादर करण्यात आला. त्यानुसार मायणी पक्षी आश्रयस्थान शाश्‍वत विकास साधून पर्यटन विकास करण्याच्या दृष्टीने येथील ग्रामस्थ व पक्षीप्रेमी नागरिकांची बैठक आयोजित करण्यात आली होती.

 

त्यानुसार सदर प्रस्ताव शासनाकडून लवकरच मंजूर होऊन येथील पक्षी आश्रयस्थानाचा विकास करण्यात येणार असल्याचे बेन यांनी स्पष्ट केले. याविषयी ग्रामस्थांचे उद्बोधन करून हक्क सुरक्षित ठेवण्याबाबत सांगण्यात आले. डॉ. श्यामसुंदर मिरजकर, माजी उपसरपंच सूरज पाटील, दादासाहेब कचरे, पोपट मिंड, बाळासाहेब कांबळे, अंकुश चव्हाण व राजाराम कचरे यांनी मनोगत व्यक्त केले.

येथील तलाव परिसरातील जुन्या बागेची झालेली पडझड पाहून या बागेस उजाळा देण्यासाठी मायणीतील युवक दत्ता कोळी व सागर घाडगे यांनी वनविभागाची रितसर परवानगी घेऊन बागेच्या स्वच्छतेचे काम हाती घेतले. त्यांच्या या सामाजिक कार्यात मायणीतील राज सामाजिक संस्था, शिवनेरी ग्रुप, जगदंब ग्रुप, सह्याद्री ट्रेकर्स ग्रुप, विनायक दुर्गामाता ग्रुप, मानवाधिकार संघटना, भूमाता ब्रिगेड, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ व वजीर ग्रुप यांनीही सहभाग नोंदवला. सुमारे दीड महिन्याच्या कालावधीत या ठिकाणची जुनी बाग स्वच्छ होऊन या परिसराला गतवैभव मिळाले. परिसराचे संवर्धन करण्याचा प्रयत्न केला आहे. आज कोल्हापूर प्रादेशिक वनविभागाचे प्रमुख मुख्य वनसंरक्षक डॉ. बेन व्ही. क्लेमेंट, साताराचे उपवनसंरक्षक डॉ. भारतसिंग हाडा यांच्यासह अन्य प्रमुख अधिकार्‍यांनी मायणी पक्षी आश्रयस्थान या ठिकाणी भेट देऊन स्थानिक युवक व नागरिकांच्या केलेल्या कामाचे कौतुक करत हा परिसर आणखी निसर्गरम्य करण्यासाठी यशस्वी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.

यावेळी ग्रामपंचायत सदस्य रणजित माने, सातारचे सहाय्यक उपवनसंरक्षक संजीवन चव्हाण, वडूजचे वनक्षेत्रपाल शीतल फुंदे, मायणीचे वनपाल काश्मीर शिंदे, वनरक्षक संजीवनी खाडे, कलेढोणचे वनरक्षक मुंडे, पाचवडचे वनरक्षक पारधी प्रकाश, संजय गुदगे, प्रा. विकास कांबळे, मिलिंद देशमुखे, श्रीकांत सुरमुख, सागर माळी, सूरज माळी व ग्रामस्थ उपस्थित होते. 


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!