स्थैर्य, मुंबई, दि.१०: मुंबईची तुलना पाकिस्तानसोबत केल्याने उठलेल्या वादंगानंतर अभिनेत्री कंगना रनोट बुधवारी दुपारी 2.45 वाजता थोरली बहीण रंगोलीसह मुंबईत पोहोचली. दरम्यान मुंबई विमानतळावर बराच गोंधळ बघायला मिळाला. कंगनाचे समर्थक आणि विरोधक समोरा-समोर आले होते. कंगनाला पाठिंबा देण्यासाठी रामदास आठवले यांचे दोन डझनहून अधिक कार्यकर्ते विमानतळावर हजर होते, तर दुसरीकडे शिवसेनेचे कार्यकर्तेदेखील काळे झेंडे आणि बॅनर घेऊन कंगनाला आपला विरोध दर्शवत होते. सुरक्षेच्या दृष्टीने यावेळी व्हीआयपी गेटऐवजी कंगनाला दुस-या गेटमधून बाहेर काढण्यात आले. येथून ती थेट तिच्या घरी पोहोचली. सध्या सुरक्षेच्या कारणास्तव तिच्या घराबाहेर 50 हून अधिक पोलिस तैनात करण्यात आले आहेत.
होम क्वारंटाइनचा बसला शिक्का
मुंबई विमानतळावर बीएसीकडून कंगनाच्या हातावर होम क्वारंटाइनचा शिक्का लावण्यात आला आहे. यापूर्वीच मुंबईच्या महापौर महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या होत्या की, कोरोना गाइडलाइन्सनुसार कंगनाला 14 दिवसांसाठी होम क्वारंटाइन व्हावे लागेल. मात्र कंगनाने 7 दिवसांत परत जाण्याचे तिकीट दाखवले तर तिला यापासून सूट मिळेल.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आव्हान
घरी पोहोचताच कंगनाने “हा लोकशाहीचा मृत्यू,” असे म्हणत एक व्हिडिओ पोस्ट केला आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आव्हान दिले आहे. ती म्हणाली की, आज माझे घर तुटले आहे, उद्या तुमचा अहंकार मोडेल. जय महाराष्ट्र.
कंगना म्हणाली, ”उद्धव ठाकरे, तुम्हाला काय वाटते, चित्रपट माफियांसोबत मिळून तुम्ही माझे घर तोडून मोठा सूड उगवला. तुम्ही खूप मोठे उपकार केले आहे. काश्मिरी पंडितांसोबत काय घडले असेल, हे मला माहित होते. मात्र आज मला याची जाणीव झाली आहे. आज मी तुम्हाला एक वचन देते की, मी केवळ अयोध्येवरच नाही तर काश्मीरवरही एक चित्रपट बनवेल. मी माझ्या देशातील लोकांना जागे करेन. ठाकरे जे क्रौर्य आणि दहशत माझ्याबाबतीत घडली आहे, त्याला नक्कीच अर्थ आहे. जय हिंद. जय भारत”, अशा शब्दांत कंगनाने आपला संताप व्यक्त केला आहे.
कंगना मुंबई विमानतळावर दाखल झाली तेव्हाचा हा व्हिडिओ आहे.