
फलटण येथील चौगुले इंडस्ट्रीजने कामगारांचे पगार रोखले. पगार न मिळाल्यास कामगार संघर्ष संघटना सातारा कामगार उपायुक्तांकडे तक्रार दाखल करणार. जिल्हाध्यक्ष अमर झेंडे यांचे निवेदन.
स्थैर्य, फलटण, दि. २३ डिसेंबर : फलटण येथील चौगुले इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने कामगारांचे पगार विनाकारण थकवल्याचा आरोप कामगार संघर्ष संघटनेने केला आहे. कामगारांच्या हक्काचे आणि कष्टाचे पैसे तत्काळ न मिळाल्यास या विरोधात सातारा येथील कामगार उपायुक्त कार्यालयात रीतसर तक्रार दाखल करण्यात येईल, असा इशारा संघटनेचे सातारा जिल्हाध्यक्ष अमर झेंडे यांनी कंपनी प्रशासनाला निवेदनाद्वारे दिला आहे.
कामगार संघर्ष संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सनी काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाध्यक्ष अमर झेंडे यांनी आज (दि. २३) कंपनी प्रशासनाला निवेदन दिले. निवेदनात म्हटले आहे की, कंपनीने कामगारांचे पगार विनाकारण रोखून धरले आहेत, ज्यामुळे कामगारांवर अन्याय होत आहे. कामगारांनी हजेरी मस्टरवर जेवढे दिवस काम केले आहे, त्या दिवसांचा मोबदला त्यांना त्वरित मिळावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
जर कंपनीने पगार देण्यात टाळाटाळ केली, तर कामगार संघर्ष संघटना गप्प बसणार नाही. या अन्यायाविरोधात कामगार उपायुक्त, सातारा यांच्याकडे रीतसर तक्रार दाखल केली जाईल, असा सज्जड दम अमर झेंडे यांनी दिला आहे. “आमच्या हक्काचा आणि कष्टाचा पैसा मिळावा, हा अन्याय सहन केला जाणार नाही,” अशी भूमिका कामगारांनी घेतली आहे.
संघटनेने दिलेल्या पत्रात खालील कामगारांचे अंदाजित पगार थकल्याचे नमूद करण्यात आले आहे:
या निवेदनावर जिल्हाध्यक्ष अमर झेंडे यांच्यासह संबंधित बाधित कामगारांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

