
दैनिक स्थैर्य । दि. ३० नोव्हेंबर २०२१ । सातारा । कामेरीची वाघीण कु.आरोही लोखंडे हिने ज्या प्रमाणे वजीर सुळका फक्त तीस मिनिटांत पार केला त्याचप्रमाणे जुन्नर येथील वानरलिंगी सुळका अवघ्या पन्नास मिनिटांत पार करून सर्वात लहान गिर्यारोहक होण्याचा किताब आपल्या नावावर केला.
साताऱ्यातील कामेरी ता.सातारा या गावात राहणाऱ्या ६ वर्ष वय असणाऱ्या कु.आरोही सचिन लोखंडे या मुलीने संविधान दिनाचे औचित्य साधून घाटघरच्या परिसरातील चढाईसाठी अतिकठिण श्रेणीत गणला जाणारा सुमारे ४५० फूट उंचीचा वानरलिंगी सुळका अवघ्या पन्नास मिनिटांत पार करत दुसरा थरारक विक्रम स्वतःच्या नावावर करत गाव तसेच तालुक्यासहित सातारा जिल्ह्याचे शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, आरोही लोखंडे ही मुलगी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील कामेरीच्या इयत्ता पहिलीच्या वर्गात शिकत आहे. आरोहीने वानरलिंगी सुळका रॅपलिंग आणि केबलिंग खडतर असा जीवधन किल्ला ही तीने त्याच दिवशी सर केला आहे. माहुलीच्या शेजारी म्हणून उभा असलेला वजीर सुळका २८० फूट उंचीचा ३० मिनिटांत पार केला आहे. वडिलांच्या पावलांवर पाऊल ठेऊन आरोहीने सहाव्या वर्षीच १५ दिवसाच्या अंतराने जुन्नर येथील जीवधन किल्ल्याचा पहारेकरी म्हणून स्वतःची ओळख निर्माण करणारा वानरलिंगी सुळका पार करून तिच्या सुळक्यांच्या यादीत अजून एक चित्त थरारक सुळक्याची भर कमाई केली आणि या सुळक्याच्या सर्वोच्च माथ्यावर पोहोचल्यावर भारतीय तिरंगा ध्वजाला मानवंदना दिली. तिच्यासोबत कामेरीमधून तिचे सहकारी वडील सचिन लोखंडे, रुद्र लोखंडे, छोटी बहीण प्रज्ञा लोखंडे, प्रशांत सुतार हे उपस्थित होते. तसेच या प्रोत्साहन प्रसंगी पॉईंट ब्रेक एडव्हेचर्स यांचे मोलाचे सहकार्य लाभले….!