दैनिक स्थैर्य । दि. १६ जुलै २०२१ । पुणे । महाराष्ट्राला उद्योगाची समृद्ध अशी परंपरा आहे. देशाच्या आर्थिक समृद्धीसाठी महाराष्ट्रातील उद्योग हे नेहमीच योगदान देण्यामध्ये अग्रेसर राहिले आहेत. अशा उद्योगांमध्ये महाराष्ट्रातील नवनवीन प्रयोग यशस्वी करण्यामध्ये अनेक उद्योजकांचा सहभाग आहे. याच दिशेने वाटचाल करणार्या रोहन कांबळे आणि शशिकांत कांबळे यांच्या ‘डेक्स्टो’ अॅटोमोबाईल अॅण्ड पॉवर सोल्यूशन प्रा. लि. कंपनीची ही गोष्ट. सतत स्वप्नांच्या शोधात राहणारी आणि मला नेमके काय हवंय याचा ध्यास घेऊन जगणारी माणसं दुर्मिळ असतात. अशीच वेगळी वाट निवडली आहे रोहन कांबळे आणि शशिकांत कांबळे यांनी.
या कंपनीच्या प्रवासाबद्दल सांगताना रोहन कांबळे सांगतात की, ‘‘बेळगाव येथे इजिनिअरींग शिक्षण पूर्ण केल्यानंतर ‘विप्रो’सारख्या कंपनीत मॅनेजर पदावर काम करण्याची संधी मिळाली. आणि त्या निमित्ताने कॅलिफॉर्निया, दुबई, जर्मनी, चीन, या ठिकाणी काम करायला मिळाले. बारावीला असल्यापासूनच गाड्यांचे आकर्षण होते. आणि काहीतरी नावीन्यपूर्ण करायचे हे तेव्हाच ठरविले होते. अनेक वेगवेगळे यशस्वी प्रयोग केल्यानंतर चीन येथे यशस्वीपणे इलेक्ट्रीकल कार बनविण्यामध्ये माझा सहभागही महत्त्वाचा होता. त्यानंतर भारतात आल्यावर वाटलं की, आपण इलेक्ट्रीकल कार का निर्माण करू नये, असे वाटू लागले. याच दरम्यान माझे जवळचे बंधू शशिकांत कांबळे यांना भेटलो. आणि माझ्या मनातील इलेक्ट्रीकल कारच्या कंपनीची कल्पना सांगितली. त्यांनाही कल्पना खूप आवडली. त्यावेळी ते भारती विद्यापीठमध्ये जनसंपर्क अधिकारी म्हणून काम करीत होते. मग ‘डेक्स्टो’ या नावाने कंपनी सुरू करण्याचा निर्णय घेतला. जर्मनी, दुबई, चीन या ठिकाणी असलेल्या माझ्या मित्रांनाही ही कल्पना फार आवडली. त्याप्रमाणे 2018मध्ये आम्ही कंपनीची स्थापना केली.’’
‘‘इतर कंपन्यांच्या तुलनेत आपण काय वेगळे देऊ शकतो यावर आम्ही मित्रांनी संशोधन केले. बॅटरी, चार्जर, कारचे अॅवरेज, यावर फोकस दिला. आणि महत्त्वाचे म्हणजे कारची सुरक्षितता यावर संशोधन झाले. चीनमध्ये जाऊन तेथील यशस्वी आठ कंपन्यांबरोबर सामंजस्य करार केला. जर्मनी येथील कंपनीबरोबर चार्जिंग सेंटरबाबत सामंजस्य करार केला. ज्या देशांमध्ये इलेक्ट्रीकल कार कोणत्या कारणांमुळे यशस्वी झाली, त्या त्या देशांच्या सरकारी योजना काय आहेत, याचा अभ्यास आम्ही केला. आणि आपल्या देशामधील रस्त्यावर ही कार चालविण्यासाठी आपण कोणते अॅडव्हान्स फिचर्स देऊ शकतो हाही अभ्यास आम्ही केला आणि आपल्या कारसाठी सिंगल चार्जिंगमध्ये आपण 350 किमी अॅव्हरेज देत आहोत. त्याच बरोबर महत्त्वाचे म्हणजे बॅटरी स्वॅपिंग सेंटरचेही नियोजन केले आहे. लवकरच आपण आपल्या कंपनीची डेमो कार लाँच करत आहोत’’, असेही रोहन कांबळे यांनी स्पष्ट केले.
या कंपनीची दुसरी बाजू सांभाळणारे शशिकांत कांबळे सांगतात, ‘‘रोहनने कारची कंपनी सुरू करू या सांगितल्यानंतर सुरुवातीला थोडं अवघड वाटलं. पण वाटलं बघू या करूच आपण. आयुष्याच्या प्रवासात आपल्याला विविध प्रकारच्या व्यक्ती भेटतात. अनेक घटना-प्रसंगांना सामोरे जावे लागते. त्यातून वेगवेगळे अनुभव येतात. त्यातले काही अनुभव चांगले असतात. काही घटना वाईट, काही सुखकारक असतात. तर काही अनुभव मन थक्क करणारे असतात. त्यावेळी भारती विद्यापीठमध्ये काम करत होतो. डॉ. पतंगराव कदम हे नेहमी सांगायचे, की आपला उद्देश चांगला असेल आणि अंगी जिद्द असेल तर कितीही मोठं स्वप्न पाहा आणि पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करा. तुमचं स्वप्न पूर्ण व्हायला वेळ लागत नाही. हे अनुभव पाठीशी असल्यामुळे आम्ही ठरवले की, आपण असंच करायचं.’’
‘‘कार कंपनीसाठी लागणारे मोठे भांडवल आणि त्याच बरोबर डेमो कारसाठी लागणार खर्च हे सगळं आपल्याला जमणार का, हा विचार सुरू असताना आपल्याला मार्गदर्शन करणारी टीम पाठीशी असेल तर मार्ग मिळेल म्हणून या टीममध्ये येण्यासाठी आम्ही यू.जी.सी.चे माजी अध्यक्ष डॉ. सुखदेव थोरात, सर्जिकल स्ट्राइकचे लेफ्ट. जनरल राजेंद्र निंभोरकर, कमानी ट्यूबच्या अध्यक्षा पद्मश्री कल्पना सरोज आणि महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा विजया रहाटकर मॅडम यांना विनंती केली. आणि आमची मार्गदर्शन टीम तयार झाली. ‘डेक्स्टो’ कंपनीच्या डिझाइन आणि आपले वेगळेपण यामुळे महाराष्ट्र शासनाच्या इलेक्ट्रीक वाहनांच्या संदर्भातील धोरणामुळे आम्हाला कंपनीसाठी जागा द्यायला हे सरकार नक्कीच मदत करेल, असे वाटत आहे. त्यामुळे सध्या आम्ही डेमो कारच्या कामावर फोकस केला आहे. डिसेंबर ते जानेवारी दरम्यान आपल्या कंपनीची ई-रिक्षा लाँच करण्याचा आमचा मानस असल्यामुळे ‘डेक्स्टो’ कंपनीचे हे स्वप्न मोठे आहे. सामान्य कुटुंबातून हे निर्माण करणं अवघड असतं, परंतु साथ देणारी टीम आणि आपली ध्येय, धोरणे, चांगली असतील तर अवघड कामही सोपं होतं, हे वेगळं सांगायला नको. फ्रॅन्क ड्युएन (चीन), पीटएली (चीन), रॉबर्ट अंडरसन (कॅलिफॉर्निया), क्रीस्टीन लँग (बर्लिन), डॉ. महेश ठोणे (जर्मनी), गणेश सोनवणे (पुणे) अशी ही ‘डेक्स्टो’ची टीम आहे’’, असेही शशिकांत कांबळे यांनी सांगितले.