दैनिक स्थैर्य । दि. १६ डिसेंबर २०२१ । सातारा । सातारा वन विभागाचे बिबटयापासून संरक्षण करावयाच्या उपाययोजना कागदावरच रहात असल्याचे स्पष्ट होत आहे . ठोसेघरमध्ये वनविभागाची प्रबोधन मोहिम सुरू असताना नावली येथे बिबट्याने मानवी वस्तीत घुसून पांडुरंग शिंदे यांची कालवड ठार केली . या हल्ल्यामुळे बिबट्याचे हल्ले रोखण्यासाठी होणाऱ्या उपाययोजनांचा फोलपणा समोर आला आहे .
मिळालेल्या माहीतीनुसार, बुधवार आज सकाळी पांडुरंग शिंदे यांची गुरे चरावयास घरा शेजारील शिवारात गेली असता अचानक बिबटय़ाने तीन वर्षाच्या कालवडीवर हल्ला केला, यात कालवड जखमी झाली. अराडाओरडा केल्याने तिची बिबटय़ापासुन गुराख्यांनी सुटका केली. मात्र, काही वेळातच तिचा मृत्यू झाला.
डोंगरकपारीत वास्तव्य करणाऱ्या शेतकऱ्यांची शेती आणि पशुधन यावरच उपजिवीका अवलंबून असून त्यावर वन्यप्राण्यांचा घाला सुरु असल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहे. रानगवे, वानर, माकड, डुक्कर, साळींदर, मोर आदी प्राणी शेती फस्त करत असून, बिबटे जनावरे फस्त करत आहेत. गवे, अस्वलांचे माणसांवर हल्ले वाढले असल्याने शेतकरी चिंतातुर झाला आहे. मात्र वनविभागाच्या उपाययोजना नियोजन शुन्य असल्याने वन्यप्राणी वस्तीत घुसू लागले असून, शेतकऱयांना मदतीपासूनही वंचीत राहावे लागत आहे.
रानगव्यांचा सुध्दा वाढता धोका
याच गावातील पांडुरंग शिंदे व विठ्ठल शिंदे यांच्या शेतीतील 4 एकर गहु रानगवांनी फस्त केला आहे. वनविभागाचे सातारा वनक्षेत्रपाल निवृत्ती चव्हाण यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी करुन कुटुंबीयांना मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले आहे.