राजवाडा शिल्प अनावरण प्रकरणी भाजप कार्यकर्ते ताब्यात; शाहूपुरी पोलिसांची कारवाई

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य । दि. २२ डिसेंबर २०२१ । सातारा । छत्रपती शिवाजी महाराजांच्या बंगळुरूतील पुतळ्याच्या विटंबनेच्या घटनेने वातावरण तप्त असतानाच आज सायंकाळी सातारा येथील राजवाडा बसस्थानक आवारात झाकून ठेवलेल्या वादग्रस्त शिल्पकृतीचे हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी अनधिकृतपणे उद्घाटन केल्याची घटना घडली. या घटनेमुळे राजवाडा परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन भाजप नगरसेवक विजय काटवटे, मिलिंद एकबोटे तसेच काही हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.

राजवाडा बसस्थानक आवारात जवळपास दोन वर्षांपूर्वी हे शिल्प उभारण्यात आले आहे. मात्र या शिल्पकृतीमधील छत्रपती शिवाजी महाराज व समर्थ रामदास स्वामी भेटीसंबंधीच्या शिल्पकृतीवर आक्षेप घेत विविध संघटनांनी त्याच्या प्रदर्शनास कडाडून विरोध केला होता. त्यामुळे त्याचे उद्घाटन लटकले होते. तसेच कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलीस यंत्रणेने संपूर्ण शिल्पकृतीवर आवरण टाकून ते झाकून ठेवले होते.

आज सायंकाळी साडेपाचच्या सुमारास भाजपचे नगरसेवक विजय काटवटे यांच्यासह काही हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी जमून शिल्पकृतीवरील आवरण फाडून काढले व अनधिकृतपणे उद्घाटनाचा बनाव केला. यावेळी या लोकांनी छत्रपती शिवरायांच्या शिल्पकृतीवर प्लॅस्टिकच्या बाटलीतून आणलेले दूध व पाणी ओतून घाईगडबडीत अभिषेकाचा सोपस्कार करून घेतला. यावेळी या लोकांनी भारतमाता की जय, हिंदू धर्म की जय, जय श्रीराम अशा घोषणा दिल्या. तसेच फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.
या घटनेमुळे राजवाडा स्थानक परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. या प्रकाराची माहिती मिळताच राजवाडा स्थानकावर मोठ्या प्रमाणावर पोलीस फौजफाटा दाखल झाला. पोलिसांनी घटनास्थळावरून नगरसेवक विजय काटवटे, मिलिंद एकबोटे यांच्यासह हिंदुत्ववादी कार्यकत्र्यांना ताब्यात घेतले.


Back to top button
Don`t copy text!