स्थैर्य, कलेढोण, दि. 2 : कलेढोण गावाने ग्रामपंचायतीची उत्कृष्ट व भव्य इमारत बांधून एक आदर्श काम केले आहे, असे प्रतिपादन आ. जयकुमार गोरे यांनी केले.
कलेढोण ग्रामपंचायचीच्या नवीन इमारतीच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी सरपंच कॅप्टन भास्करराव खरात, उपसरपंच विजयराव जाधव, ग्रामविकास अधिकारी आर. एम. फडतरे व ग्रामपंचायत सदस्य व कर्मचारी ग्रामस्थ उपस्थित होते.
आ. गोरे म्हणाले, समाजभूषण हणमंतराव साळुंखे पतसंस्थेचे चेअरमन संजीव साळुंखे, सरपंच कॅप्टन भास्करराव खरात व त्यांच्या सर्व टीमने केलेले काम कौतुकास्पद आहे. संकटाला सामोरे जाण्याची क्षमता खटावच्या जनतेत आहे हे दाखवून दिले आहे. 22 लाखांचा निधी आपण स्थानिक विकास निधीतून या इमारतीस मिळवून दिला आहे. पाण्याचा प्रश्न आपण आग्रहाने सोडवू. यापुढे गावासाठी आपण अजूनही विकासाची कामे करणार आहोत. विधानसभेच्या माध्यमातून मला भरभरून दिलेल्या प्रेमातून उतराई होण्याचा प्रयत्न यापुढेही नक्की करत रहाणार. सध्या कोरोनाच्या संक्रमणाच्या काळात सर्वांनी आपली स्वतःची व कुटुंबाची काळजी घेण्याचे आवाहनही त्यांनी केले.
अध्यक्षीय भाषणात पतसंस्थेचे चेअरमन संजीव साळुंखे म्हणाले, गेली 85 वर्ष कलेढोण ग्रामपंचायतीचा कारभार मारुती मंदिराच्या वर चालत होता. ही अवस्था आज बदलत आहे. जिल्ह्यात प्रशस्त अशी ग्रामपंचायत इमारत कलेढोणमध्ये उभी राहिली. हा खर्या अर्थाने इतिहासातील भाग्याचा क्षण आहे.