
दैनिक स्थैर्य । दि. १८ जुलै २०२१ । सातारा । खून, जबरी चोरी, घरफोडी, चोरीसारख्या गुन्ह्यात 4 वर्षापासून फरार असलेला अट्टल चोरटा जक्कल उर्फ जकल्या रंगा काळे रा. सुरुर याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रेवडी, ता. कोरेगाव येथून जेरबंद केले. जकल्या काळे उसाच्या शेतात लपून बसला असतानाच वेषांतर करून आलेल्या पथकाने त्याच्या मुसक्या आवळल्या. त्याच्याकडून 10 गुन्हे उघड झाले असून 4.68 लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी फरार आरोपी जकल्या काळे याने वाई, जावली, कोरेगाव, खंडाळा, सातारा तालुक्यामध्ये घरफोड्या केल्या असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. त्यामुळे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने खंडाळा, कोरेगाव व वाई तालुक्यामध्ये त्याचा रानावनात, उसाचे शेतामध्ये मजूराच्या वेषात वेषांतर करुन शोध घेतला. अखेर 11 जुलै रोजी काळे रेवडी, ता. कोरेगाव, जि. सातारा येथे उसाच्या शेतामध्ये लपला असल्याची माहिती प्राप्त झाली. त्या अनुषंगाने नमुद पथकाने सराईत गुन्हेगार जक्कल रंगा काळे ज्या उसाच्या शेतामध्ये लपला होता. त्याच्या आजुबाजूस सापळा लावून त्यास ऊसाचे शेतातून शिताफीने ताब्यात घेतले.
त्याची कसून चौकशी केली असता त्याने सर्वप्रथम कोरेगाव पोलीस ठाण्यात दाखल गुन्हयाची कबुली दिली. त्यास या गुन्हयात अटक करुन प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, कोर्ट कोरेगाव यांचे कोर्टातून 5 दिवस पोलीस कोठडी रिमांड घेण्यात आली. गुन्हयाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे हे करत आहेत. दरम्यान, पोलीस आरोपीची कोठडीत सखोल व कौशल्यपूर्वक विचारपूस केली असता त्याने कोरेगाव, वाठार, मेढा, वाई, भुईंज, सातारा तालुका, खंडाळा या पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकूण 10 घरफोडी चोरीचे गुन्हे केले असल्याची कबुली दिली असून त्याच्याकडून आतापर्यंत 4 लाख 68 हजार किंमतीचे 10 तोळे सोने हस्तगत करण्यात आले आहे. जक्कल रंगा काळे याच्यावर खूनाचे 2, जबरी चोरीचे 2, घरफोडीचे 9, चोरीचे 2, पोलीस अटकेतून फरार होणे 1 असे एकुण 16 गुन्हे दाखल असून 4 वर्षापासुन फरार होता.
पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे व आनंदसिंग साबळे, पोलीस उपनिरीक्षक मधुकर गुरव, सहा. फौजदार उत्तम दबडे, तानाजी माने, पो. हवालदार कांतीलाल नवघणे, संतोष पवार, संतोष सपकाळ, संजय शिर्के, विजय कांबळे, अतिश घाडगे पो.ना. शरद बेबले, साबीर मुल्ला, नितीन गोगावले, मंगेश महाडीक, प्रवीण फडतरे, प्रमोद सावंत, रवि वाघमारे, निलेश काटकर, मुनीर मुल्ला, अर्जुन शिरतोडे, गणेश कापरे, अमित सपकाळ, पो.कॉ.विक्रम पिसाळ, विशाल पवार, रोहित निकम, सचिन ससाणे, वैभव सावंत, धीरज महाडीक, प्रविण पवार, विजय सावंत, गणेश कचरे यांनी ही कारवाई केली आहे.