
काळज येथे एसटी बसेस थांबत नसल्याने ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. १० महिन्यांत कार्यवाही न झाल्याने माजी उपसरपंच सचिन गाढवे पाटील यांनी ८ दिवसांत ‘रास्ता रोको’ करण्याचा इशारा दिला आहे. वाचा सविस्तर.
स्थैर्य, काळज, दि. ०९ डिसेंबर : पुणे-पंढरपूर महामार्गावर वसलेल्या काळज (ता. फलटण) येथे एसटी बसेस थांबत नसल्याने विद्यार्थी आणि प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. यासंदर्भात गेल्या १० महिन्यांपासून सातत्याने पाठपुरावा करूनही फलटण आगार प्रमुखांनी (Depot Manager) कोणतीही दखल घेतली नाही. त्यामुळे आता ग्रामस्थ आक्रमक झाले असून, “येत्या आठ दिवसांत एसटी गाड्यांना थांबा दिला नाही, तर पंचक्रोशीतील ग्रामस्थांसह महामार्गावर तीव्र ‘रास्ता रोको’ आंदोलन करू,” असा खणखणीत इशारा काळजचे माजी उपसरपंच आणि सामाजिक कार्यकर्ते सचिन गाढवे पाटील यांनी दिला आहे.
१० महिन्यांपासून प्रस्ताव धूळखात
काळज येथे फलटण आगाराच्या सर्व गाड्या थांबवण्यात याव्यात, यासाठी १० महिन्यांपूर्वी काळज ग्रामपंचायतीचा अधिकृत प्रस्ताव आणि आमदार सचिन पाटील यांचे शिफारस पत्र फलटण आगार प्रमुख श्री. चव्हाण यांना देण्यात आले होते. मात्र, इतका मोठा कालावधी उलटूनही आणि वारंवार विनंती करूनही आगार प्रमुखांनी या मागणीला वाटाण्याच्या अक्षदा लावल्या आहेत. प्रशासनाच्या या उदासीन धोरणामुळे ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
पंचक्रोशीतील प्रवाशांची परवड
काळज हे गाव पुणे-पंढरपूर महामार्गालगत असल्याने येथून दळणवळणाची मोठी वर्दळ असते. काळजसह तडवळे, डोंबाळवाडी, घाडगे मळा, नांदल आणि मुरूम या गावांतील असंख्य विद्यार्थी, शेतकरी आणि रुग्ण या थांब्याचा वापर करतात. तसेच पुणे, मुंबई, सातारा येथे नोकरीसाठी जाणारे तरुण आणि लोणंद-फलटणला बाजारासाठी जाणाऱ्या महिलांची संख्या मोठी आहे. वाढती लोकसंख्या आणि प्रवाशांची गर्दी असूनही गाड्या थांबत नसल्याने प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
प्रशासनाला शेवटचा इशारा
एसटी महामंडळाने सर्वसामान्य प्रवाशांच्या सोयीकडे केलेले दुर्लक्ष आता खपवून घेतले जाणार नाही.
“आगार प्रमुखांनी लवकरात लवकर यावर तोडगा काढून फलटण आगाराच्या सर्व गाड्यांना काळज येथे थांबण्याची परवानगी द्यावी. जर येत्या आठ दिवसांत यावर निर्णय झाला नाही, तर काळज व पंचक्रोशीतील सर्व गावे एकत्र येऊन रास्ता रोको आंदोलन करतील,” असा इशारा सचिन गाढवे पाटील यांनी दिला आहे.

