
स्थैर्य, हिंगणगाव, दि. ३० ऑगस्ट : फलटण तालुक्यातील हिंगणगाव येथील काकडे कुटुंबीयांनी मृत्यूनंतरच्या पारंपरिक प्रथेला बगल देत एक अत्यंत आदर्श आणि पर्यावरणपूरक निर्णय घेतला आहे. आपल्या आप्ताच्या अस्थी नदीच्या प्रवाहात विसर्जित न करता, त्या स्वतःच्या शेतातील मातीत मिसळून त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ वृक्षारोपण केले. त्यांच्या या निर्णयाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
हिंगणगाव येथील कै. वंदना बजरंग काकडे यांचे नुकतेच निधन झाले. दि. २९ ऑगस्ट रोजी त्यांच्या अस्थी संकलन आणि पुण्यानुमोदन कार्यक्रमावेळी, भारतीय बौद्ध महासभा फलटण तालुक्याचे कार्यालयीन सचिव बौद्धाचार्य चंद्रकांत मोहिते यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्यांनी बौद्ध धम्मातील विज्ञानवादी दृष्टिकोन आणि पर्यावरण रक्षणाचे महत्त्व पटवून दिले. “जग अनित्य आहे, मात्र आपल्या प्रियजनांच्या स्मृती जतन करण्यासाठी त्यांच्या नावाने झाडे लावणे, हाच खरा आदर्श आहे,” असा संदेश त्यांनी दिला.
या विचारांनी प्रेरित होऊन काकडे कुटुंबीयांनी अस्थी पाण्यात विसर्जित करण्याऐवजी त्या शेतातील मातीत मिसळल्या आणि त्याच ठिकाणी बोधिवृक्ष (पिंपळ) व आंब्याचे झाड लावून कै. वंदना काकडे यांच्या स्मृती कायमस्वरूपी जपण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या कृतीमुळे पर्यावरण संवर्धनाचा एक अनोखा संदेश समाजात पोहोचला आहे. या निर्णयाचे उपस्थित नातेवाईक आणि ग्रामस्थांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत केले.
यावेळी वृक्षारोपण करताना धीरज बजरंग काकडे, सुरज भीमराव काकडे, सागर जगदीश बागडे, ताराचंद बापूराव काकडे, अभिजीत प्रकाश कांबळे, गणेश संतोष जगताप, ॲड. सुरेंद्र सरतापे आणि विशाल राजेश काकडे यांच्यासह आप्तेष्ट व ग्रामस्थ उपस्थित होते.