दैनिक स्थैर्य | दि. ९ एप्रिल २०२३ | फलटण |
आरडगाव, ता. फलटण येथे प्रथम स्मृतीदिनी एक अनोखा उपक्रम हाती घेण्यात आला. स्मृतीदिनानिमित्त पुस्तके वाटप करण्याचे आयोजन करण्यात आले. कै. सौ. सीमा सुरेश भोईटे यांचे एक वर्षापूर्वी निधन झाले आहे. प्रथम स्मृतीदिनी त्यांच्या आठवणींना स्मरण करत असताना पत्रकार सुरेश भोईटे व समस्त भोईटे कुटुंबियांकडून या कार्यक्रमास उपस्थित असलेल्या महिलांना विविध स्वरूपाची पुस्तके वाटप करून पुस्तकाच्या माध्यमातून वाचन संस्कृती पेरण्याची किमया करण्यात आली.
‘वाचाल तर वाचाल’ हा संदेश देऊन वाचन संस्कृती रूजिवण्याचे काम प्रथम स्मृती दिनी कार्यक्रमातून करण्यात आल्याने या उपक्रमाबद्दल आयोजकांचे विशेष कौतुक सर्व स्तरातून होत आहे. यावेळी ही पुस्तके सुप्रसिद्ध व्याख्याते, प्रवचनकार, कथाकार प्रा. रविंद्र कोकरे (सर) यांच्या हस्ते महिलांना देण्यात आली. हा उपक्रम कौतुकास्पद असून आज कोणत्याही कार्यक्रमास सामाजिक बांधिलकी जपणार्या उपक्रमाची जोड असायला हवी. त्यात पुस्तके भेट देणारा हा उपक्रम खूप कौतुकाचा वाटतो. शिवाय पुस्तक आणि पुस्तकातील विचार ते माणसामध्ये माणसाशी एक विचाराचे नाते तयार करणारे आहे. असे उपक्रम होणे अपेक्षित आहे. वाचन संस्कृती लोकांमध्ये रूजावी असाच प्रयत्न पत्रकार भोईटे यांनी केला असल्याचे प्रा. रवींद्र कोकरे यांनी सांगितले. पुस्तक देण्यापूर्वी ‘आई’ या विषयावर प्रा.रवींद्र कोकरे यांनी प्रवचन केले.
घरातील आई-वडील, मुलगा, मुलगी यांनी कायम एकमेकांशी संवाद साधणेे गरजेचे आहे. सूनेने सासूला आपली आई मानणे व सासूने आपल्या सूनेला मुलीप्रमाणे समजूनच वागविले पाहिजे.
कुटुंबातील सदस्यांची सेवा करणे, हीच खरी ईश्वर सेवा आहे. माणसाने माणसाशी माणूस म्हणून वागले पाहिजे. प्रा.रवींद्र कोकरे यांनी मानवी मनामध्ये एक सकारात्मक ऊर्जा आणण्याचा प्रवचनातून प्रयत्न केला. कै. सौ. सीमा भोईटे यांना सुद्धा वाचनाची व स्वच्छतेची प्रचंड आवड होती. महिलांनी त्यांचे हे गुण घ्यायला हवेत, असेही त्यांनी गौरवोद्गार काढले.
यावेळी फलटण-कोरेगावचे आमदार दीपक चव्हाण, आनंदराव शेळके (पाटील), माजी समाजकल्याण सभापती तथा सस्तेवाडीचे उद्योगपती अशोकशेठ सस्ते, तरडगावचे माजी सरपंच अतुल गायकवाड, संजय गांधी निराधार योजना फलटणचे माजी अध्यक्ष विठ्ठलराव गायकवाड, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुभाष झुंजार, लोणंदचे योग प्रशिक्षक संतोष सस्ते, कॉन्ट्रक्टर सुनिल यादव, पराग भोईटे, जयदिप ढमाळ, रमेश (अण्णा) शिंदे, कुचेकर साहेब, वाईचे सामाजिक कार्यकर्ते रमेश पुजारी, रविंद्र शिंदे, दिलीप वाघमारे, रणजित लेंभे, अरुण जायकर, सुशिल गायकवाड, विजय शेळके या सर्वांनी कुटुंबियांची भेट घेत कै. सौ. सीमा भोईटे यांच्या प्रतिमेस अभिवादन केले.
यावेळी पत्रकारिता क्षेत्रासह शैक्षणिक, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मंडळी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.