कै. नामदेवराव सूर्यवंशी बेडके महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे शिबीर उत्साहात संपन्न

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. १९ फेब्रुवारी २०२३ | फलटण |
कै. नामदेवराव सूर्यवंशी (बेडके) महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना युनिटचे विशेष श्रमसंस्कार शिबिर निवासी कॅम्प १३ फेब्रुवारी ते १९ फेब्रुवारीदरम्यान विडणी येथे संपन्न झाले. रविवार, दि.१९ रोजी शिबिराच्या समारोप कार्यक्रमासाठी ग्रामपंचायत कार्यालयाच्या सभागृहात प्रमुख पाहुणे म्हणून पत्रकार श्री. सदाशिव मोहिते तसेच कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री. चंद्रकांत लक्ष्मणराव पवार उपाध्यक्ष, श्रीराम एज्युकेशन सोसायटी फलटण हे होते. ग्रामपंचायत विडणीचे सरपंच श्री. सागर अभंग यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. विडणीचे ग्रामविकास अधिकारी, ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील, विविध क्षेत्रातील मान्यवर, ग्रामस्थ व एनएसएस कॅम्पचे शिबिरार्थी यावेळी उपस्थित होते.

प्रारंभी माता सरस्वती व संस्थापक कै. नामदेवराव बळवंतराव सूर्यवंशी (बेडके) नानांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्ज्वलन करण्यात आले. प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजनाचे प्रकल्पाधिकारी प्रा. डॉ. सतेज दणाणे यांनी सादर केले. त्यामध्ये त्यांनी शिबिरार्थी यांच्या कार्याचे कौतुक केले व विडणी गावचे सरपंच व ग्रामस्थ यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त केली. यानंतर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दीपक राऊत यांनी एन. एस. एस. कॅम्पचा आढावा सादर केला.

कार्यक्रमात उपस्थित सर्व मान्यवर व पदाधिकारी यांचा पुष्पगुच्छ व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी सरपंचांच्या सूचनेनुसार विडणी ग्रामपंचायतीच्या वतीने उपस्थित मान्यवर, प्राध्यापक वृंद व सर्व शिबिरार्थींचा ही श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.

शिबिरार्थीं शिवम घनवट, मयूर साळवे, कु. रिया मुलानी, कु. संजना चव्हाण, कु. धनश्री धोत्रे, रमेश बोडरे, समीर दडस, सूरज पोकळे, उमेश नाळे, कु. प्रेरणा रणवरे, कु. विशाखा मोरे, कु. साक्षी तिवाटणे इत्यादींनी एन एस एस कॅम्प चे अनुभव व गाव आणि ग्रामस्थांप्रति कृतज्ञता व्यक्त केली.

विडणी गावचे पोलीस पाटील श्री धनाजी नेरकर यांनी आपल्या भावना व्यक्त करताना स्पष्ट केले की, एनएसएस कॅम्प हा विद्यार्थ्यांच्या जीवनाला कलाटणी देणारा क्षण असतो. अशा कॅम्पद्वारे विद्यार्थ्या मध्ये सामाजिक जाणीव रुजवली जाते व ग्रामविकास साधला जातो. यावेळी त्यांनी आपल्या कॉलेज जीवनातील एनएसएस कॅम्पचे अनुभव कथन केले. दैनिक ‘धैर्य’चे संपादक श्री. सचिन मोरे यांनी विद्यार्थ्यांना जीवनातील यशस्वितेसंदर्भात विविध यश प्राप्त व्यक्तींचे उदाहरण देऊन कठोर परिश्रम हा कानमंत्र सांगितला. तसेच वक्तृत्व, नेतृत्व व कर्तृत्व याबद्दल मौलिक मार्गदर्शन केले.

विडणी ग्रामपंचायत अधिकारी श्री. आप्पासाहेब साळुंखे यांनी आपल्या भाषणामध्ये विडणी गाव व एनएसएस कॅम्प यांच्या समन्वयाबद्दल गौरवोद्गार काढले. तसेच विडणी गावचा आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक विकास याबद्दल माहिती दिली. विडणी ग्रामपंचायत सरपंच श्री. सागर अभंग यांनी विद्यार्थ्यांना ग्रामीण जीवन म्हणजे काय? सामाजिक कार्याची गरज, वक्तृत्व कला, यशस्वी व्यावसाय, सामाजिकता इत्यादी बद्दल मौलिक मार्गदर्शन केले. ग्राम विकासासाठी वाहून घ्या, असे सांगितले. एनएसएस ही व्यक्तिमत्व विकासाचे शिबिर असून याद्वारे आपण आपल्या कलागुणांना व सुप्त गुणांचा विकास केला पाहिजे व एक सुजाण नागरिक बनण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तसेच त्यांनी पुन्हा विडणीमध्ये कॅम्प घेण्यासंदर्भात आमंत्रण दिले. विद्यार्थ्यांचे भरभरून कौतुक केले व त्यांच्या कार्याबद्दल समाधान व्यक्त केले.

प्रमुख पाहुणे दैनिक ‘जनमत’ व ‘पुढारी’चे प्रतिनिधी श्री. सदाशिव रामचंद्र मोहिते सर यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात विद्यार्थ्यांना सामाजिक कार्य, देशभक्ती व करियर याबद्दल बहुमोल असे मार्गदर्शन केले.

समारोप कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीराम एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष श्री. चंद्रकांत लक्ष्मणराव पवार यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये विद्यार्थ्यांचे कौतुक केले व विडणी ग्रामपंचायतीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमास सामाजिक कार्यकर्ते श्री. गणेश नाळे, अन्य ग्रामपंचायत सदस्य, महाविद्यालयाचे प्राध्यापक-प्राध्यापिका, विडणी गावचे युवक, ग्रामस्थ व शिबिरार्थी उपस्थित होते.

सूत्रसंचालन कु. साक्षी तिवाटणे, प्रास्ताविक प्रा. डॉ. सतेज दणाणे, कॅम्प आढावा प्र. प्राचार्य डॉ. दीपक राऊत, स्वागत सत्कार प्रा. डॉ. संदेश बिचुकले, आभार प्रकल्प अधिकारी प्रा. डॉ. सतेज दणाणे यांनी मानले. राष्ट्रीय सेवा योजना च्या घोषणा देऊन व राष्ट्रीय सेवा योजना गीत गाऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.


Back to top button
Don`t copy text!