दैनिक स्थैर्य । दि. ०७ ऑक्टोबर २०२२ । सातारा । सातारा जिल्ह्याच्या कासपठाराला लाखो पर्यटक भेट देतात. या वर्षी पर्यटनाला चालना मिळावी म्हणून पर्यटन विभाग, जिल्हा प्रशासन व वन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कास महोत्सव 2022 ला खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले व जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्या उपस्थितीत उत्साहात सुरुवात झाली.
यावेळी उपवनसंरक्षक महादेव मोहिते, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अजित बोऱ्हाडे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणाच्या प्रकल्प संचालक सुषमा देसाई, जिल्हा नियोजन अधिकारी शशिकांत माळी, विभागीय वन अधिकारी सामाजिक वनीकरण हरिश्चंद्र वाघमोडे, उपसंचालक वन्यजीव उत्तम सावंत, पर्यटन संचालनालयाचे उप अभियंता शांताराम पुजारी, विविध विभागाचे अधिकारी, पर्यटक व स्टॉलधारक उपस्थित होते.
यावेळी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले म्हणाले, येथील पर्यटन वाढीसाठी व स्थानिकांना रोजगार उपलब्ध होण्यासाठी कास महोत्सव 2022 चे आयोजन करण्यात आले आहे. येथील पर्यटकांना विविध सास्कृंतिक कार्यक्रम या महोत्सवात पाहता येतील. तसेच स्थानिकांनी आपल्या येथील विविध उत्पादनाचे स्टॉल विक्रीसाठी लावलेले आहेत, त्यातून पर्यटकांना येथील स्थानिक खाद्य संस्कृती व पदार्थांची माहिती होईल. स्थानिकांना यातून रोजगार निर्मिती होईल. येथील पर्यावरणाला कोणताही धक्का न लावता हा महोत्सव आयोजित केला आहे.
यावेळी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी म्हणाले, या महोत्सवाच्या निमित्ताने कास परिसरातील गावाची माहिती देणे, त्यांची वैशिष्ट्यांची माहिती देणे हा उद्देश आहे. तसेच कास जवळच्या गावांना यासाठी मोफत स्टॉल देण्यात आले आहेत. यावेळी वन विभागामार्फत कास परिसराबद्दल माहितीही पर्यटकांना उपलब्ध करुन दिली जाणार आहे. पर्यटकांच्या करमणुकीसाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले आहे. या कास महोत्सवाला जास्तीत जास्त नागरिकांनी व पर्यटकांनी भेट द्यावी, असे आवाहनही श्री. जयवंशी यांनी यावेळी केले.
कास महोत्सव 2022 दिनांक 7, 8 व 9 ऑक्टोबर या कालावधीत कास रोड, आटाळी येथे सकाळी 10 ते सायं 6 यावेळेत पर्यटकांसाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.