दैनिक स्थैर्य | दि. ०४ डिसेंबर २०२४ | फलटण | के. बी. उद्योग समूहातील सर्व विभागांप्रमाणे पतसंस्थेतही दूरदर्शीपणे चांगले निर्णय घेतल्याने स्पर्धेच्या युगातही या संस्थेची प्रगती उत्तम असल्याचे सांगताना आज अनेक प्रसंगांना सामोरे जात असताना प्रगती राहु द्या, आहे ही स्थिती टिकविण्यासाठी मोठी मेहनत घ्यावी लागते, अशा परिस्थितीत यशाचे एकेक पाऊल निर्धाराने पुढे टाकत यशस्वी होत आहात हे कौतुकास्पद असल्याचे स्पष्ट प्रतिपादन सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक संचालक व छत्रपती संभाजी महाराज पतसंस्थेचे संस्थापक रामभाऊ लेंभे यांनी केले आहे.
गॅलेक्सी को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि., फलटणच्या फलटण येथील ४ थ्या शाखेचा कामकाज शुभारंभ
रामभाऊ लेंभे यांच्या हस्ते समारंभपूर्वक करण्यात आला, अध्यक्षस्थानी के. बी. उद्योग समूहाचे संचालक व गॅलेक्सीचे चेअरमन सचिन यादव होते.
यावेळी पत संस्थेचे व्हा. चेअरमन श्री. योगेश रघुनाथ यादव व संचालक, सभासद, ठेवीदार, खातेदार, हितचिंतक व शहरातील नागरिक, के. बी. उद्योग समूहातील अधिकारी/कर्मचारी उपस्थित होते.
कर्ज वितरणात अनंत अडचणी आहेत, पण आपण नवीन तंत्रज्ञानाचा आधार घेऊन काम करता आहात, विशेषतः एकाद्या चांगल्या बँकेपेक्षा उत्तम पद्धतीने डिजिटल बँकिंग सुरु करुन दूरदृष्टी सोबत १४०० अधिकारी/कर्मचारी यांना सोबत घेऊन उत्तम संघटन कौशल्याद्वारे चांगले काम करता आहात, अवघ्या ४/५ वर्षात गरुड भरारी मारली असल्याबद्दल रामभाऊ लेंभे यांनी सचिन यादव व सहकाऱ्यांचे कौतुक केले.
सलग ४०/५० वर्षे या क्षेत्रात काम करताना अनंत अनुभव गाठीशी असल्याने अल्पावधीत या सर्वांवर मात करुन अनोख्या कामकाज पद्धतीद्वारे नावारुपाला आणलेल्या गॅलेक्सी पतसंस्थेचा हेवा वाटावा असे उत्तम काम करता आहात, आपल्या संस्थेची केवळ प्रगती नव्हे एक दर्जेदार आणि इतरांना मार्गदर्शक ठरेल अशी संस्था म्हणून नावलौकिक लाभेल याची खात्री देत रामभाऊ लेंभे यांनी शुभेच्छा दिल्या.
आर्थिक संस्था चालविताना फार काळजी घ्यावी लागते, कारण ठेवीदारांनी पैसा सांभाळण्याची जबाबदारी मोठ्या विश्वासाने आपल्यावर सोपविलेली असते, त्या विश्वासाला तडा जाऊ नये म्हणून गॅलेक्सी चालविताना कधीही गफलत होऊ दिली नसल्याचे सांगताना कंपनी चालविताना आर्थिक नियोजनाला अत्यंत महत्व असते, येथे के. बी. मध्ये ६ संस्था चालविताना अत्यंत काटेकोर नियोजन करावे लागते, ते उत्तम असल्याने चिंता नाही, तथापि त्यातही गॅलेक्सी चालविताना ही संस्था वेगळी ठेवून येथील ४८ अधिकारी/कर्मचाऱ्यांवर विश्वास ठेवून आणि त्यांच्या क्षमता विकसित करुन त्यांच्यावर जबाबदारी दिल्याचे अध्यक्षीय भाषणात सचिन यादव यांनी आवर्जून स्पष्ट केले.
संस्था उभारताना पहिल्या ५ वर्षाचे नियोजन व प्रगतीचा आराखडा निश्चित करण्याची आणि आराखड्यानुसार कामकाज होईल यासाठी प्रयत्न करण्याची आपली पद्धत आहे, त्याप्रमाणे आपण नेहमी यशस्वी झाल्याचे सचिन यादव यांनी अभिमानाने सांगितले.
प्रशिक्षण व विकास यावर सतत विचार व अभ्यास करण्याची पद्धती आपण रामभाऊ लेंभे यांच्या संस्थेत पाहिल्यानंतर त्यावर अभ्यास केला आणि त्यानंतर गॅलेक्सीची प्रत्येक वर्षी एक शाखा सुरु करण्याचा निर्णय बदलून आता आवाका आल्याने यावर्षी ४ शाखांचे नियोजन करुन पुणे शहरात अधिक शाखा सुरु करण्याचा आपला प्रयत्न असल्याचे सचिन यादव यांनी निदर्शनास आणून दिले.
के. बी. उद्योग समूहाच्या माध्यमातून आपण सतत समाजाला काही तरी देण्याचा विचार केला, आणि त्याप्रमाणे संस्था चालविताना संस्थेच्या यशाबरोबर समाजाचा विचार केल्याचे सचिन यादव यांनी यावेळी आवर्जून सांगितले.
गॅलेक्सीच्या माध्यमातून कामकाज करताना कोणत्याही ठेवीदार, कर्जदार यांना त्रास होणार नाही, डिजिटलायझेशन स्वीकारण्यास अनेक संस्था घाबरतात पण आपण त्याला प्राधान्य देवून गॅलेक्सी मध्ये, ही कार्यपद्धती प्राधान्याने स्वीकारली त्यामध्ये कामाला गती आणि अचूकता याबरोबरच गैरव्यवहाराला थारा नसल्याचे सचिन यादव यांनी स्पष्ट केले.
संस्था चालविताना त्यामध्ये कामकाज करताना तेथील अधिकारी/कर्मचारी यांना प्रशिक्षित करुन त्यांच्या वर संस्थेची जबाबदारी देताना त्यांच्या कुटुंबाची जबाबदारी विचारात घेऊन त्यांना पुरेसे आणि योग्य वेतन देण्याची काळजी घेतली जात असल्याने ही सर्व मंडळी आपली जबाबदारी उत्साहाने पार पाडीत संस्थेचा ब्रँड विकसित करतात असे सांगताना आमच्या १४०० कामगारांनी किंबहुना आमच्या कुटुंबीयांनीच आमचा ब्रँड निर्माण केल्याचे सचिन यादव यांनी अभिमानाने सांगितले. कमिन्स पेक्षा अधिक वेतन व सेवा सुविधा देणारी आपली कंपनी असून आगामी काळात आपल्या या कुटुंबाचा विस्तार करुन किमान ५ हजार तरुणांना नोकरीत सामावून घेऊन त्यांच्या कुटुंबांचा सर्वांगीण विकास साधणार असल्याचे सचिन यादव यांनी स्पष्ट केले.
फलटण मध्ये आर्थिक संस्था चालविणे कठीण असल्याचे बोलले जात असले तरी, उत्तम प्रकारे कामकाज आणि योग्य प्रकारे कर्ज वितरण आणि ठेवींना उत्तम संरक्षण असल्याचे स्पष्ट झाल्याने संस्थेचा एनपीए २ टक्के पेक्षा कमी असल्याचे सांगत या कामात रामभाऊ लेंभे यांना ज्येष्ठ बंधू मानून संस्था उत्तम चालविण्याबरोबर समाजाला काही देण्याचा निर्णय आपण निश्चित घेणार असल्याचे सचिन यादव यांनी स्पष्ट केले.
प्रारंभी संचालक ॲड. लोंढे यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत केल्यानंतर प्रास्ताविकात गॅलेक्सी संस्थेच्या प्रगतीचा आढावा घेताना चेअरमन सचिन यादव यांचे के. बी. उद्योगाच्या उभरणीतील योगदान आणि त्यांच्या मुळेच शेती व शेतकरी यांच्यासाठी घेतलेले निर्णय याबाबत माहिती देताना आगामी काळात यादव साहेबांच्या नेतृत्वाखाली अधिक प्रगती होत असताना समाजाला नक्की लाभ मिळेल याची ग्वाही दिली.
तज्ञ संचालक लक्ष्मण नामदेव पाटील यांनी सर्वांचे आभार मानले.