स्थैर्य, फलटण : के. बी. एक्स्पोर्टच्या माध्यमातून शेतकऱ्यांना निर्यातक्षम भाजीपाला पिकविण्यासाठी प्रोत्साहन व मार्गदर्शन केले जाते, त्याचबरोबर करार पद्धतीने उत्पादित भाजीपाला खरेदी करण्यासाठी के. बी. एक्स्पोर्ट नेहमीच शेतकऱ्यांना सहकार्य करीत असल्याचे लक्ष्मणराव पाटील यांनी सांगितले. शेतकरी हा कृषी क्षेत्राचा केंद्र बिंदू असून सध्या देशभर सुरु असलेल्या करोना युद्धातील खरा योद्धा शेतकरीच असल्याचे नमूद करीत आजच्या अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत अन्नधान्य व भाजीपाला पिकविणाऱ्या शेतकऱ्यांचे आरोग्य उत्तम असणे आवश्यक आहे, म्हणून निर्यातक्षम भाजीपाला व भेंडी उत्पादक शेतकऱ्यांना मास्क व सॅनिटायझर वितरण हा स्तुत्य उपक्रम असल्याचे उपविभागीय कृषी अधिकारी प्रकाश सुर्यवंशी यांनी स्पष्ट केले.
के. बी. एक्स्पोर्ट आणि शासकीय कृषी खात्यांतर्गत राजाळे, ता. फलटण मंडल कार्यालय यांच्या संयुक्त सहभागाने निर्यातक्षम भाजीपाला व भेंडी उत्पादक शेतकऱ्यांना मास्क व सॅनिटायझरचे वितरण उप विभागीय कृषी अधिकारी प्रकाश सुर्यवंशी यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी तंत्र अधिकारी फिरोज शेख, मंडल कृषी अधिकारी भरत रणवरे, के. बी. एक्स्पोर्टचे समीर खिलारे, लक्षणराव पाटील, कृषी पर्यवेक्षक मल्हारी नाळे, कृषी सहाय्यक सचिन जाधव यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.
शेती व शेतकऱ्यांच्या हितासाठी सतत प्रयत्नशील असलेल्या के. बी. एक्स्पोर्टने सामाजिक बांधीलकी जपत समाजोपयोगी विविध उपक्रम राबविण्यातही के. बी. एक्स्पोर्टचे संचालक सचिन यादव यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सतत प्रयत्नशील असल्याचे लक्ष्मणराव पाटील यांनी निदर्शनास आणून दिले.
कृषी सहाय्यक सचिन जाधव यांनी प्रारंभी सर्व उपस्थितांचे स्वागत केल्यानंतर प्रस्तविकात कार्यक्रमाविषयी विवेचन केले.