
स्थैर्य, फलटण, दि. 24 ऑक्टोबर : शेती पारंपरिक पद्धतीने न करता, रासायनिक खतांचा वापर टाळून सेंद्रिय पद्धतीने कशी फायदेशीर ठरू शकते, याचे उत्तम उदाहरण के.बी. ग्रुप ऑफ कंपनीजने घालून दिले आहे, असे गौरवोद्गार राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी काढले. फलटण येथील के.बी. ग्रुपच्या कॅम्पसला भेट दिली असता ते बोलत होते. कंपनीच्या कार्याला शासनाचे संपूर्ण सहकार्य राहील, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.
कृषी मंत्री भरणे यांनी के.बी. ग्रुपच्या संपूर्ण कॅम्पसची पाहणी केली. यामध्ये एक्सपोर्ट युनिट, बायो-ऑरगॅनिक पेस्टिसाईड निर्मिती विभाग आणि कंपनीने विकसित केलेल्या विविध कृषी उत्पादनांची माहिती घेतली. कंपनीचे संचालक सचिन यादव यांनी त्यांचे स्वागत केले आणि कंपनीच्या कार्याची सविस्तर माहिती दिली.
यावेळी बोलताना भरणे म्हणाले, “उपमुख्यमंत्री अजित पवार साहेबांनी मला के.बी. ग्रुपला भेट देण्याची सूचना केली होती. इथे आल्यानंतर यादव साहेबांचे काम पाहून मी खरोखरच प्रभावित झालो आहे. कोणतीही गोष्ट शून्यातून उभी करणे सोपे नसते, पण यादव साहेबांनी केवळ स्वतःच्या कंपनीचा विकास केला नाही, तर परिसरातील दहा हजार शेतकऱ्यांना एकत्र आणून त्यांना निर्यातक्षम शेतीसाठी मार्गदर्शन केले आहे.”
के.बी. एक्सपोर्ट्सच्या माध्यमातून बेबी कॉर्न, भेंडी, मिरची, पेरू, दुधी भोपळा, आंबा अशा विविध उत्पादनांची निर्यात केली जाते. शेतकऱ्याला बियाण्यापासून ते मालाच्या मार्केटिंगपर्यंत सर्व मार्गदर्शन कंपनी करते, ज्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत झाली आहे, याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
भरणे यांनी कंपनीच्या बायो-ऑरगॅनिक पेस्टिसाईड विभागातील संशोधनाचे विशेष कौतुक केले. ते म्हणाले, “रासायनिक खते आणि कीटकनाशकांमुळे होणारे दुष्परिणाम टाळण्यासाठी सेंद्रिय शेती हाच भविष्यकाळ आहे. के.बी. ग्रुपने या क्षेत्रात केलेले संशोधन कौतुकास्पद आहे. शासनाचा कृषी मंत्री म्हणून मी खात्री देतो की, तुमच्या या बायो-ऑरगॅनिक उत्पादनांना आणि इतर उपक्रमांना शासनाकडून जिथे जिथे गरज भासेल, तिथे संपूर्ण सहकार्य केले जाईल.”
कंपनीचा ३६ एकरचा भव्य आणि स्वच्छ परिसर, येथील संशोधन आणि एकूणच कामाची पद्धत पाहून आनंद झाल्याचे भरणे यांनी नमूद केले. महाराष्ट्रासह १२ राज्यांमध्ये आणि ३२ देशांमध्ये कंपनीचे काम सुरू असल्याचे समजल्यावर त्यांनी आश्चर्य व्यक्त केले आणि यादव यांच्या कार्याला शुभेच्छा दिल्या.

