
दैनिक स्थैर्य । दि. ११ ऑक्टोबर २०२२ । फलटण । नवरात्रीच्या ९ दिवसात दुर्गा मातेच्या ९ रुपांची भक्तिभावाने पुजा करुन उत्साहपूर्ण वातावरणात फलटण मध्ये दुर्गोत्सव मोठ्या आनंदात साजरा करण्यात आला, त्यामध्ये दांडिया खेळण्याला असलेले विशेष महत्व लक्षात घेऊन के. बी. एक्सपोर्ट कंपनी आयोजीत के. बी. कल्चर या कार्यक्रमाच्या माध्यमातून भरगच्च बक्षिसांच्या भव्य दांडिया स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या. मोठ्या संख्येने स्पर्धक सहभागी झाले होते.
कंपनीचे डायरेक्टर सचिन यादव व गॅलेक्सी क्रेडिट को – ऑप. सोसायटीच्या संचालिका सौ. सुजाता यादव यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने मोठ्या जल्लोषात स्पर्धांचा शुभारंभ करण्यात आला.
स्पर्धकांनी पारंपारिक वेशभूषेत आपल्या दांडिया खेळण्याच्या कलेचे सादरीकरण खूप मोठ्या उत्साहात व आनंदमय वातावरणात केले. काही स्पर्धकांनी उत्कृष्ठ गरबा नृत्य सादर करुन उपस्थितांची मने जिंकली.
विविध विभागातून कंपनीत स्पर्धेच्या निमित्ताने पहिल्यांदाच आलेल्या व्यक्तींनी अवाक होत, कंपनीच्या सुंदर व सुसज्ज कॅम्पसचे, कंपनी मॅनेजमेंट कडून सर्व सोयी सुविधा युक्त व्यवस्थेचे व भव्य कार्यक्रम नियोजनाचे सर्वांनीच तोंड भरुन कौतुक केले. एवढेच नव्हे तर कॉलेज दशकातील स्पर्धकांना सुत्र संचालकांनी आपणांस कंपनीत सर्वात जास्त काय आवडले? असा सवाल करताच, कंपनीचे खास करुन कल्चर आवडले असल्याचे सांगत आम्हाला शिक्षण पूर्ण झाल्यानंतर या कल्चर मध्ये भविष्यात प्रथम पसंतीने जॉब करण्यास आवडेल हे अधोरेखित करुन स्पष्ट केले.
या स्पर्धेत २१ ग्रुप मधून १७५ स्पर्धक सहभागी झाले होते, सर्वच स्पर्धकांनी आपली कला खूप उत्साहपूर्ण प्रदर्शित केली. त्यामध्ये दांडिया स्पर्धेचे प्रथम क्रमांकाचे ११ हजार १११ रुपयांचे पारितोषिक व सन्मानचिन्ह तुळजाभवानी ग्रुप फलटण या टीमने, तर ७ हजार ७७७ रुपयांचे द्वितीय पारितोषिक व सन्मानचिन्ह नृत्यकला अकॅडमी या टीमला आणि ५ हजार ५५५ रुपयांचे तृतीय पारितोषिक व सन्मानचिन्ह शिवशंभू ग्रुपला देण्यात आले.
कंपनीचे डायरेक्टर सचिन यादव व गॅलेक्सी क्रेडिट को – ऑप. सोसायटीच्या संचालिका सौ. सुजाता यादव यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. या दोघांनी विजेत्या स्पर्धकांचे कौतुक करीत त्यांचे अभिनंदन केले आणि स्पर्धेत सहभागी संघांचे ही कौतुक केले.
विजेत्या संघांनी कंपनी कल्चरचे कौतुक करत त्यांना कला सादर करण्यासाठी भव्य स्टेज उपलब्ध करुन दिल्याबद्दल आभार व्यक्त केले. ही दांडिया स्पर्धा विद्युत रोषणाई व प्रचंड प्रेक्षकांच्या उपस्थितीत डोळ्याचे पारणे फेडणारी ठरली.
प्रामुख्याने संचालक सचिन यादव आणि सौ. सुजाता यादव यांच्या मार्गदर्शनाखाली अशांत साबळे मॅनेजर, गणेश निकम मॅनेजर, हेमंत खलाटे अडमीन मॅनेजर, योगेश यादव मॅनेजर संकलन, संदीप शिंदे पीआरओ यांनी संपूर्ण स्पर्धेचे उत्तम नियोजन केल्याबद्दल त्यांचे विविध स्तरावरुन अभिनंदन होत आहे.