
स्थैर्य, आरडगाव, दि. ०६ सप्टेंबर : रयत शिक्षण संस्थेच्या श्री ज्योतिर्लिंग इंग्लिश स्कूल, चव्हाणवाडी येथील विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. तब्बल ७६ संघांचा सहभाग असलेल्या या स्पर्धेत शाळेच्या विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी करत कोल्हापूर येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेसाठी आपली पात्रता निश्चित केली आहे.
फलटण तालुक्यातील खराडेवाडी येथील सद्गुरु गाडगे महाराज आश्रम शाळेत ४ सप्टेंबर रोजी या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये सातारा जिल्ह्यातील विविध शाळांच्या संघांनी सहभाग घेतला होता. अत्यंत चुरशीच्या झालेल्या टेनिक्वाईट स्पर्धेत श्री ज्योतिर्लिंग इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी आपले कौशल्य पणाला लावले.
या स्पर्धेत १७ वर्षे वयोगटातील मुलांच्या संघाने प्रथम क्रमांक पटकावत विभागीय स्पर्धेत आपले स्थान निश्चित केले. यासोबतच १७ वर्षीय मुलींच्या संघाने तृतीय क्रमांक, १९ वर्षे वयोगटातील मुले व मुली या दोन्ही संघांनी द्वितीय क्रमांक आणि १४ वर्षे वयोगटातील मुलींनी तृतीय क्रमांक पटकावून शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला.
विभागीय स्पर्धेसाठी निवड झालेल्या विजयी संघात श्रेयश शिंदे (इ. १०वी), कुणाल चव्हाण (इ. ९वी), श्रवण भोईटे (इ. १०वी), चिन्मय चव्हाण (इ. १०वी) आणि सार्थक भोईटे (इ. १०वी) या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. या घवघवीत यशाबद्दल स्कूल कमिटीचे अध्यक्ष दत्तात्रय चव्हाण, सदस्या सुप्रियाताई आहीरेकर, मुख्याध्यापक विठ्ठल निकाळजे, तसेच चव्हाणवाडी ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. या यशामागे शाळेतील उपशिक्षक राजेंद्र राजपुरे यांचे मार्गदर्शन आणि परिश्रम महत्त्वपूर्ण ठरले.

