
दैनिक स्थैर्य । 25 जुलै 2025 । सातारा । धोम वाई खून खटल्यात माफीची साक्षीदार असलेल्या ज्योती मांढरे ला पन्नास हजाराच्या जात मुचलक्यावर व पन्नास हजाराच्या वैयक्तिक जात मुचलक्यावर येथील अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश मेहेरे यांनी जामीन मंजूर केला. गर्भवती असल्याने स्वतःची काळजी घेण्यासाठी जामीन मिळावा, असा अर्ज ज्योतीने न्यायालयात केला होता. त्याला न्यायालयाने मंजुरी दिली.
या खटल्याची सुनावणी वाई येथील अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश मेहेरे यांच्यासमोर सुरू आहे. मागील सुनावणीच्या वेळी ज्योती मांढरेच्या जामीनाची मुदत संपल्याने तिने न्यायालयासमोर शरणागती पत्करली होती. यानंतर न्यायालयाने तिची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली होती. बुधवार (दि.23) रोजी झालेल्या सुनावणीच्या वेळी गर्भवती असल्याने जामिनासाठी न्यायालयात अर्ज केला होता.
यावर सरकार पक्षाने जामीन देण्यास हरकत नसल्याचे न्यायालयास सांगितल्याने संशयित आरोपी संतोष पोळ याने हरकत घेतली. त्याने ज्योती मांढरे वर अनेक आरोप केले. सहाय्यक सरकारी वकील अॅड. मिलिंद ओक यांनी सरकार पक्षाची बाजू मांडली. ज्योती मांढरेचे वकील विक्रम काकडे यांनी आपले म्हणणे मांडले. पोळच्या वतीने ऍड. ऋषिकेश सकुंडे यांनी बाजू मांडली. न्यायालयाने पन्नास हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर व पन्नास हजाराच्या वैयक्तिक जात मुलाक्यावर जामीन मंजूर केला.