
दैनिक स्थैर्य । दि. २० जून २०२२ । सोलापूर । स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त ‘मानवतेसाठी योग’ या विषयावरील योग शिबिराचे, आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्तानं हरीभाई देवकरण प्रशालेच्या मैदानावर सकाळी सात ते आठ या वेळेत आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली.
जागतिक योगदिनाचे हे आठवे वर्ष साजरे करण्यात येत आहे. योगाचा प्रसार व्हावा म्हणून दरवर्षी हा उपक्रम राबविला जातो. भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या केंद्रीय संचार ब्युरो, क्षेत्रीय कार्यालय सोलापूर, जिल्हा प्रशासन, नेहरू युवा केंद्र, योग समन्वय समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आठव्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. योग उपक्रमाची सुरूवात शंखध्वनीने होणार आहे. यानंतर भारतीय योग संस्थेच्यावतीने शिथिलकरण व्यायाम होतील. योग सेवा मंडळ, योग साधना सेवासदन आणि विवेकानंद केंद्र यांच्यावतीने आसने होतील. पंतजली योगपीठ यांचे कडून बैठे आसने होतील. आर्ट ऑफ लिव्हिंच्या वतीने ध्यानधारणा होणार आहे. सदरील शिबिरामध्ये सोलापूर शहरातील क्रीडा व योग प्रेमींनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे.
सदरील योगाच्या उपक्रमामध्ये जिल्हाधिकारी कार्यालय, पोलिस आयुक्तालय, जिल्हा परिषद, सोलापूर महानगरपालिका, पोलिस अधिक्षक कार्यालय, पुण्यशोल्क अहिल्याबाई होळकर सोलापूर विदयापीठ, एन.एच.आय., एस.आर.पी.एफ, पोलिस प्रशिक्षण केंद्र, एन.सी.सी. बटालियन 9 व 38, जिल्हा माहिती कार्यालय, राष्ट्रीय सेवा योजना, सह संचालक उच्च शिक्षण कार्यालय, भारत स्काउट गाईड, पतंजली योगपीठ, योग असोसिएशन, दि आर्ट ऑफ लिव्हिंग, विवेकानंद केंद्र, भारतीय योग संस्था, योग सेवा मंडळ, योग साधना मंडळ, गीता परिवार सर्व कल्याण योग, रुद्र अकादमाी ऑफ मार्शल आर्ट अॅंड योग, योग परिषद आणि योग साधना सेवासदन, या शहरातील सर्व संस्थांचे सदस्य मोठ्या प्रमाणात सहभागी होणार आहेत. त्याचबरोबर जिल्ह्यातील सर्व शहर मुख्यालयामध्ये राहणारे शासकीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार आहेत. सदरील योग शिबिर सोलापूर शहरातील सर्वांसाठी खुले असून नागरिकांनी 21 जून 2022 रोजी सकाळी 06.30 वाजता उपस्थित राहावे, असे आवाहन क्षेत्रीय प्रचार अधिकारी अंकुश चव्हाण यांनी केले आहे.