
सातारा – मुकुंद फडके यांचा सत्कार करताना प्राचार्य डॉ. यशवंत पाटणे, श्रीकांत कात्रे,त्यावेळी शिरीष चिटणीस, विनोद कुलकर्णी, डॉ. संदीप श्रोत्री, सौ. मंजिरी फडके, विनायक भोसले आदी.
स्थैर्य, सातारा, दि.15 ऑक्टोबर : पत्रकार हा लोकशिक्षक असतो आणि समाजाला दिशा देण्याचे काम करतो. हतबल झालेल्या समाजाला दिशा देण्याचे काम पत्रकार करू शकतो. ज्येष्ठ पत्रकार संपादक मुकुंद फडके मुकुंद फडके यांच्या लेखनातून उद्याचा सजग नागरिक घडेल, असा मला विश्वास वाटतो, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक आणि विचारवंत प्राचार्य डॉ. यशवंत पाटणे यांनी केले
दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्थेच्यावतीनेे पत्रकार, लेखक, संपादक, प्राध्यापक, वक्ते, चित्रपट अभ्यासक अशा अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाचे धनी मुकुंद फडके यांच्या षष्ठीपूर्ती निमित्त आयोजित सत्कार समारंभात श्री. पाटणे बोलत होते.
यावेळी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी, लेखक व पर्यावरण अभ्यासक डॉ. संदीप श्रोत्री, दैनिक प्रभातचे निवासी संपादक श्रीकांत कात्रे, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यवाह शिरीष चिटणीस, दीपलक्ष्मी पतसंस्थेचे व्यवस्थापक विनायक भोसले आदी मान्यवर उपस्थित होते.
प्राचार्य डॉ. यशवंत पाटणे म्हणाले, मुकुंद फडके यांचे आयुष्य हेच सुंदर गीत आहे. त्यामध्ये ताल,सूर आहे. फडके यांच्या आई वडिलांनी त्यांच्यावर चांगले संस्कार केले तेच संस्कार त्यांनी आपल्या कारकिर्दीत वापरले अनेक लेखकांना घडवण्याचे काम त्यांनी केले गुणवत्ता निर्माण करण्याची गुणग्राहकता त्यांच्याकडे आहे. फडके यांचे शब्द हे प्रेरणादायी असून त्यातून ऊर्जा मिळते. त्यांच्या लेखणीत उद्याचा सजग नागरिक निर्माण करण्याचे बळ आहे.
विनोद कुलकर्णी म्हणाले, फडके यांच्यासारख्या निस्वार्थी व्यक्तींचा सन्मान करण्याचे कार्य शिरीष चिटणीस यांनी हाती घेतले आहे. सातारा येथे होणार्या 99 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या स्मरणिकेचे काम फडके करत असून त्यांच्या अनुभवाचा उपयोग भविष्यात नक्कीच होईल.
दैनिक प्रभातचे निवासी संपादक श्रीकांत कात्रे म्हणाले, पत्रकारितेच्या प्रवासात आम्ही समवयस्क आहोत. व्यावहारिकदृष्ट्या मुकुंद फडके निवृत्त झाले असले, तरी आजही त्यांच्यात लेखन, वाचन, बोलण्याची उर्जा तितकीच आहे.
पर्यावरण अभ्यासक डॉ. संदीप श्रोत्री म्हणाले, फडके यांनी घेतलेले काम ते वेळेत आणि जबाबदारीने पूर्ण करतात. लवकरच पुस्तकप्रेमी समूहातर्फे त्यांच्या साहित्यावर आधारित मुलाखत घेण्यात येणार आहे.
महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यवाह शिरीष चिटणीस म्हणाले, दीपलक्ष्मीच्यावतीने आयोजित सांस्कृतिक उपक्रमांत मुकुंद फडके यांचे मोठे योगदान आहेत. ते प्रत्येक कलाकाराला प्रोत्साहन देतात. मुकुंद फडके यांना घडवण्यात त्यांच्या पालकांचा मोठा वाटा आहे.
सत्काराला उत्तर देताना मुकुंद फडके म्हणाले, आई वडिलांनी दिलेले संस्कार पुढे नेण्याचे काम केले. आयुष्यात अनेक चढउतार पहिले. अनेक संधी गमावल्या, पण समोर जे आले ते आनंदाने जगत गेलो. अनेक माणसे संपर्कात आली, त्याची नेहमी बेरीज होत गेली, वजाबाकी झाली नाही. ठरवून निर्णय घेतल्यामुळे आनंदाने जगत असल्याने कोणतीच तक्रार नाही. या सत्कार सोहळ्याबद्दल शिरीष चिटणीस यांचा मनापासून आभारी आहे. मुकुंद फडके यांच्या पत्नी सौ. मंजिरी फडके यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. त्यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमात डॉ. श्याम बडवे, पद्माकर पाठकजी, श्रीकांत देवधर, डॉ. लियाकत शेख, सुरेश साधले, बाळासाहेब राक्षे, नंदकुमार सावंत, विजय साबळे, संतोष वाघ, डॉ. सुहास पाटील, प्राचार्य विजयराव नलावडे, रवींद्र खांडेकर, आनंदा ननावरे, हणमंत खुडे, गीतांजली पाटोल, धनश्री बागडे, वनिता कुंभार, मंजिरी दीक्षित, उर्मिला जाँगिड, उज्वला करंबेळकर, जगदीश खंडागळे, विजय गव्हाळे आदींनी मनोगत व्यक्त केले. शिरीष चिटणीस यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले. विनायक भोसले यांनी आभार मानले.