पत्रकारांनी संत नामदेव व संत मुक्ताबाईंच्या विचारांचा आदर्श घ्यावा : डॉ अभय टिळक

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. १० जुलै २०२२ । पंढरपूर ।  भागवत धर्माच्या प्रचार व प्रसाराचे कार्य संत नामदेव महाराजांनी केले तर संत कोणाला म्हणावे याची व्याख्या संत मुक्ताबाईंनी सांगितली.  या दोन्ही संतांच्या विचारांचा आदर्श वारीतील पत्रकारांनी घ्यावा व वारकरी सांप्रदायाला बळकटी द्यावी असे आवाहन संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे विश्वस्थ डॉ अभय टिळक यांनी व्यक्त केले.

कोथळी – मुक्ताईनगर येथील संत मुक्ताबाई संस्थानच्या वतीने संस्थानचे माजी अध्यक्ष सहकार महर्षी कै . भाऊसाहेब उर्फ प्रल्हादराव पाटील यांच्या स्मरणार्थ पत्रकारिता क्षेत्रात भागवत धर्माच्या प्रचार व प्रसाराचे कार्य करणाऱ्या पत्रकारांना ” भागवत धर्म प्रचारक ” हा पुरस्कार दिला जातो . यंदाचा पुरस्कार पुण्याचे जेष्ठ पत्रकार शंकर दत्तात्रेय टेमघरे यांना देण्यात आला . त्याप्रसंगी आयोजित समारंभात डॉ टिळक बोलत होते . अध्यक्षस्थानी संत मुक्ताबाई संस्थानचे अध्यक्ष ॲड रवींद्र भैय्यासाहेब पाटील हे होते.

प्रारंभी संत मुक्ताबाई पालखी सोहळा प्रमुख ह भ प रवींद्र महाराज हरणे यांनी प्रास्ताविकात पुरस्काराची माहिती देवून सकारात्मक पत्रकारीता कशी करावी याचे उत्तम उदाहरण म्हणजे पत्रकार शंकर टेमघरे असल्याचे ते म्हणाले. पुरस्कार स्विकारल्यानंतर बोलताना पत्रकार शंकर टेमघरे म्हणाले , वारी हा संत विचारांचा सोहळा आहे . या सोहळ्यात अनेक विचारांची माणसे एकत्र येत असली तरी पंढरीची वारी व विठ्ठलाचे दर्शन हा त्यांचा मुख्य भाव असतो . हा भाव डोळ्यासमोर ठेवून सकारात्मक लिखाण करण्याचा प्रयत्न केला . वडीलांचे आशिर्वाद व वारकरी सांप्रदायातील थोरामोठ्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून गेली २५ वर्षे वारीच्या वार्तांकनाचे काम केले . त्याचेच फळ म्हणजे हा पुरस्कार होय.

या पुरस्कार वितरण सोहळ्यास संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा प्रमुख ॲड विकास ढगे पाटील , माजी आ शरद ढमाले , दिंडी समाजाचे उपाध्यक्ष भाऊसाहेब फुरसुंगीकर , संत मुक्ताबाई संस्थानचे विश्वस्थ संदीप पाटील , पंजाबराव पाटील , सम्राट पाटील , दत्तात्रेय टेमघरे , पालखी सोहळा पत्रकार संघाचे अध्यक्ष सूर्यकांत भिसे , ॲड विलास काटे , राजेंद्र मारणे , राजेंद्रकृष्ण कापसे , राघव पसरिचा , जगदीश शिंदे , अमोल पाटील , रघुनाथ वाझे यांच्यासह वारकरी सांप्रदायातील मान्यवर उपस्थित होते . सूत्रसंचालन स्वामीराज भिसे यांनी केले तर आभार संदीप पाटील यांनी मानले.


Back to top button
Don`t copy text!