
दैनिक स्थैर्य । दि. २५ फेब्रुवारी २०२२ । फलटण । ‘‘आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या विचारातून समाजासाठी आपण काही करण्याची भावना वाढीस लागते. यासाठी विचारांची संस्कृती जपण्याची आवश्यक आहे. पत्रकारांचा राजकारण्यांशी जवळचा संबंध येत असतो त्यातून राजकीय महत्त्वाकांक्षा वाढून विशिष्ठ राजकीय विचाराने पत्रकारिता होताना दिसते. पत्रकारांनी हे टाळून अराजकीय भूमिकेतून पत्रकारिता करावी, असे मत दुर्ग अभ्यासक राजीव परूळेकर यांनी तालुक्यातील पोंभुर्ले येथे व्यक्त केले. मातृभाषा जपण्याबरोबरच भाषेवर प्रेम करता आले पाहिजे. असेही त्यांनी यावेळी सांगितले.
येथील देवगड तालुका पत्रकार समितीच्यावतीने मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक ‘दर्पण’कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना जयंतीनिमित्त अभिवादन व बाळशास्त्री जांभेकर आदर्श पत्रकार पुरस्कारांचे वितरण पोंभुर्ले येथील महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीच्या ‘दर्पण’ सभागृहात संपन्न झाले त्यावेळी श्री. परूळेकर बोलत होते. यावेळी भुमी अभिलेख जिल्हा अधिक्षक विजय वीर, मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष गणेश जेठे, संतोष सावंत, सुधाकर जांभेकर, विजयदुर्ग ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक भारत फार्णे, देवगड जामसंडे नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा साक्षी प्रभू, उपनगराध्यक्षा मिताली सावंत, नगरसेविका मनिषा घाडी, शिवसेना तालुकाप्रमुख विलास साळसकर, पत्रकार समितीचे तालुकाध्यक्ष अयोध्याप्रसाद गावकर उपस्थित होते. यावेळी यंदाचा विशेष सन्मान पुरस्कार येथील सामाजिक कार्यकर्ते अनिल खडपकर यांना तसेच बाळशास्त्री जांभेकर आदर्श जेष्ठ पत्रकार पुरस्कार आनंद लोके यांना, बाळशास्त्री जांभेकर आदर्श पत्रकार पुरस्कार (शहरी विभाग) राजीव पडवळ यांना, बाळशास्त्री जांभेकर आदर्श पत्रकार पुरस्कार (ग्रामीण विभाग) पेंढरी येथील विलास गुरव यांना प्रदान करण्यात आला. शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र आणि रोख रक्कम असे पुरस्काराचे स्वरूप होते. यावेळी फलटण (सातारा) येथील महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधी संस्थेचा राज्यस्तरीय कोकण विभागाचा दर्पण पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल पत्रकार संतोष कुळकर्णी यांचाही सन्मान करण्यात आला. तसेच पत्रकार हेमंत कुळकर्णी, दयानंद मांगले, वैभव केळकर, मिठमुुंबरी सरपंच रिमा मुंबरकर यांचाही सन्मान झाला. विशेष प्राविण्य मिळवलेल्या पत्रकारांच्या पाल्यांचा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.
यावेळी श्री. परूळेकर यांनी पत्रकारितेचे बदलते स्वरूप, स्थानिक पर्यटन आणि त्यातील बारकावे, भाषा संस्कृती आणि समाज या अनुषंगाने मार्गदर्शन केले. स्थानिक पर्यटन वाढीसाठी प्रयत्न झाले पाहिजेत. पोंभुर्ले गावाकडेही पर्यटकांचा ओघ वाढला पाहिजे, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
श्री. वीर यांनी, शहर विकास आराखडा, सातबारा आणि मिळकत प्रमाणपत्र याअनुषंगाने माहिती देताना भविष्यातील जमिन मोजणीची पध्दत विशद केली.
महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे विश्वस्त अमर शेंडे यांनी संस्थेचे अध्यक्ष रविंद्र बेडकिहाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु असलेल्या बाळशास्त्रींच्या स्मरण कार्याविषयी थोडक्यात माहिती देवून गत वर्षापासून संस्थेच्या सततच्या पाठपुराव्यामुळे 20 फेब्रुवारी रोजी राज्यात शासन स्तरावर सर्वत्र बाळशास्त्रींची जयंती साजरी केली जात असल्याचे आवर्जून सांगितले.
यावेळी गणेश जेठे, संतोष सावंत, भारत फार्णे, साक्षी प्रभू, विलास साळसकर, आयोध्याप्रसाद गावकर, आनंद लोके, बाजीराव जांभेकर यांनी मनोगत व्यक्त केले.
प्रास्ताविक उपाध्यक्ष दयानंद मांगले यांनी केले. सुत्रसंचालन माजी तालुकाध्यक्ष राजेंद्र मुंबरकर यांनी केले. आभार माजी तालुकाध्यक्ष संतोष कुळकर्णी यांनी मानले.
प्रारंभी बाळशास्त्रींची प्रतिमा असलेल्या पालखीचे आगमन समारंभ स्थळी करण्यात आले. त्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सभागृहातील बाळशास्त्रींच्या अर्धपुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. पोंभुर्ले येथील शाहीर भगवान कांबळे यांनी बाळशास्त्रींवर रचलेला पोवाडा आपल्या दमदार आवाजात सादर केला. कार्यक्रमास देवगड तालुका पत्रकार समितीचे उपाध्यक्ष अनिल राणे, सचिव सचिन लळीत, गणेश आचरेकर, सुरज कोयंडे, महेश तेली, प्रमोद कांदळगावकर, रोहित वाकडे, विपुल गुरव, पोंभुर्ले ग्रामपंचायतीचे ग्रामसेावक विनायक कुंभार, पोलीस पाटील सौ.राखी मोंडे, श्रावणी काँप्युटर्सचे सतीश मदभावे आदी उपस्थित होते.
महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीच्यावतीने अभिवादन…
मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक ‘दर्पण’कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना 210 व्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीच्यावतीने संस्थेच्या पोंभुर्ले येथील ‘दर्पण’ सभागृहातील अर्धपुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन संस्थेचे विश्वस्त अमर शेंडे, रोहित वाकडे, विपुल गुरव यांनी देवगड तालुका पत्रकार समितीच्या पदाधिकारी व सदस्यांसमवेत अभिवादन केले.