महाराष्ट्रात पत्रकारांना आता दरमहा 20 हजार रुपये पेन्शन मिळणार; जेष्ठ पत्रकार रवींद्र बेडकिहाळ यांच्या मागणीला यश

आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजनेतील वाढीव सन्माननिधी वितरित


दैनिक स्थैर्य । दि. 02 ऑगस्ट 2025 । फलटण । राज्य शासनाने आचार्य बाळशास्त्री जांभेकर ज्येष्ठ पत्रकार सन्मान योजनेतील सन्माननिधी दरमहा 11 हजार रुपयांवरून वाढवून 20 हजार रुपये करण्याचा निर्णय यापूर्वीच घेतला होता. मात्र, वाढीव निधी वितरित करण्यात विलंब झाल्यामुळे महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार रविंद्र बेडकिहाळ यांनी मंत्रालयासमोर उपोषणाचा इशारा दिला होता.

या मागणीला अखेर यश आले असून शासनाने आजपासून संबंधित लाभार्थी पत्रकारांना वाढीव सन्माननिधी प्रत्यक्ष अदा करण्यास सुरुवात केली आहे. यानुसार, आता पात्र ज्येष्ठ पत्रकारांना दरमहा 20 हजार रुपये सन्माननिधी प्राप्त होणार आहे. यामुळे राज्यभरातील ज्येष्ठ पत्रकारांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.

रविंद्र बेडकिहाळ यांनी आपल्या प्रतिक्रियेत सांगितले की, ही मागणी गेल्या अनेक महिन्यांपासून प्रलंबित होती. शासनाने सकारात्मक निर्णय घेतल्यामुळे आमचे उपोषण टळले असून शासनाचे आम्ही आभार मानतो. दरम्यान, वाढीव रक्कमेचा शासन निर्णय जारी झाल्यापासून म्हणजेच एप्रिल 2024 ते जुलै 2025 या कालावधीतील फरक रक्कमही ज्येष्ठ पत्रकारांना शासनाकडून लवकर अदा व्हावी या मागणीसाठी आपला पाठपुरावा सुरु राहणार असल्याचेही रविंद्र बेडकिहाळ यांनी स्पष्ट केले.


Back to top button
Don`t copy text!