स्थैर्य, परभणी, दि. १४: रविवारी सकाळच्या सुमारास शहरातील नवा मोंढा पोलीस ठाण्यातील अधिकार्यांकडून पत्रकारांना मारहाण झाली. यावेळी पत्रकार व वृत्तपत्र विक्रेत्यांनाही पोलीसांनी लक्ष बनवले.
पालकमंत्री नवाब मलिक यांच्या आदेशावरून जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी 13 व 14 मार्च रोजी परभणीत दोन दिवसीय संचारबंदी लागू केली आहे. यास व्यापार्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत दोनही दिवस व्यापारी प्रतिष्ठाने कडकडीत बंद ठेवली. शनिवारी रस्त्यांवर तुरळीक वाहतुक सुरू होती. मात्र रविवारी या वाहतुकीत वाढ झालेली दिसून आली. दरम्यान, रविवारी सकाळच्या सुमारास वृत्तपत्रातील कर्मचारी प्रवीण कुलकर्णी यांना सकाळी सकाळी कमान परिसरात पोलिसांनी मारहाण केली. तर नवा मोंढा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आनंद बनसोडे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील वृत्तपत्र विक्रेता गंगाधर भोगे व रेल्वे स्थानकासमोरील अविनाश झोरे यांना मारहाण केली. दरम्यान जिल्हाधिकार्यांनी काढलेल्या आदेशात वृत्तपत्राचे कर्मचारी, पत्रकार व वृत्तपत्र विक्रेत्यांना सुट दिलेली आहे. असे असतानाही नवा मोंढा पोलिसांनी त्यांना मारहाण केली. या प्रकरणी वृत्तपत्र विक्रेते गंगाधर भोगे हे पोलीस ठाण्यात तक्रार देण्यास गेले असता त्यांची तक्रारही नोंदवून घेण्यात आली नाही. उलट पोलीस ठाण्यातून त्यांना परत पाठविले. या पोलिसांच्या मुजोरीचा पत्रकारांच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात येत आहे.
मी दुरध्वनीवरून माफी मागीतली-प्रभारी पोलीस निरीक्षक बनसोडे
वसमत रोडवरील काळी कमान येथे सकाळच्या सुमारास काही भाजी विक्रेते बसले होते. या विक्रेत्यांना कलम १४४ सुरू आहे. येथे गर्दी करू नये, असे सांगूनही गर्दी होत राहिली. म्हणून त्यांना पांगविण्यासाठी काही जणांना लाठी मारली. त्यात पत्रकार होते हे माहित नव्हते. ते कळाल्यानंतर त्यांची दुरध्वनीवरून माफीही मागीतली असल्याचे प्रभारी पोलीस निरीक्ष आनंद बनसोडे यांनी ‘सामना’ शी बोलताना सांगीतले.