सातारा जिल्ह्यातील कोरोना बाधीत पत्रकार व त्यांच्या कुटुंबियांना मिळणार प्राधान्याने उपचार; जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांचे आदेश; श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या प्रयत्नांना यश

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थेर्य, फलटण दि. १३: सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष उदय कबुले, उपाध्यक्ष प्रदीप विधाते, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, विषय समित्यांचे सभापती व जिल्हा परिषद सदस्य यांनी सातारा जिल्ह्यातील कोरोना बाधीत पत्रकार व त्यांच्या कुटुंबियांना प्राधान्याने बेड उपलब्ध करुन देवून तातडीने वैद्यकीय उपचार देण्याचे जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेला सूचित केले आहे. सातारा जिल्हा परिषद माजी अध्यक्ष तथा विद्यमान सदस्य श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी याबाबत पत्राद्वारे केलेली विनंती स्विकारुन मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या सहीने त्याबाबतचे आदेश निर्गमित झाले आहेत.

संपूर्ण महाराष्ट्रात कोरोनाने थैमान घातले असताना सातारा जिल्ह्यातही बिकट परिस्थिती आहे. या परिस्थितीवर मात करण्यासाठी शासन, प्रशासन, लोकप्रतिनिधींचे यशस्वी प्रयत्न सुरु आहेत. त्या प्रयत्नात लोकप्रतिनिधी, प्रशासनाला स्थानिक वृत्तपत्रे, वृत्तवाहिन्या त्यांचे प्रतिनिधींमार्फत अगदी छोट्या गावातील वाडीवस्तीवरील बाधीत रुग्ण, त्यांची स्थिती, उपचार, लसीकरण वगैरे सर्व बाबी समोर आणून देऊन योग्य भूमिका घेतली जावी, रुग्ण व त्यांचे नातेवाईकांना दिलासा मिळावा यासाठी प्रसंगी स्वत:चा जीव धोक्यात घालुन घटनास्थळी जाऊन माहिती प्रसारीत करीत आहेत.

अशा वेळी सर्व पत्रकार व त्यांच्या कुटुंबियांना तालुक्यातील त्यांच्या सोयीच्या गावात कोरोना विषयक वैद्यकीय उपचार शासकीय अथवा खाजगी रुग्णालयात तातडीने उपलब्ध होतील, असे नियोजन करुन तसे आदेश निर्गमित करण्याची विनंती जिल्हा परिषद अध्यक्ष उदय कबुले, उपाध्यक्ष प्रदीप विधाते व मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांच्याकडे श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी केली होती.

पत्रकारांच्यादृष्टीने अत्यंत महत्त्वाची बाब श्रीमंत संजीवराजे यांनी अध्यक्ष, उपाध्यक्ष व जिल्हा परिषद प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर, सातारा जिल्ह्यातील पत्रकार व त्यांचे कुटुंबातील व्यक्तीवर वेळेत उपचार होणेसाठी कोरोना केअर सेंटर (CCC), डेडिकेटेड कोरोना हॉस्पिटल (DCH), डेडिकेटेड कोरोना हेल्थ केअर सेंटर (DCHC) या मध्ये तात्काळ बेड उपलब्ध करुन देण्याबाबत कार्यवाही करण्याचे जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, उपजिल्हा रुग्णालय फलटण व कराडचे वैद्यकीय अधिक्षक, जिल्ह्यातील सर्व ग्रामीण रुग्णालयांचे वैद्यकीय अधिक्षक, जिल्ह्यातील पंचायत समित्यांचे तालुका आरोग्य अधिकारी यांना निर्देशित केले आहे.

दरम्यान, कोरोना काळातही प्रत्यक्ष फिल्डवर काम करुन समाजासाठी योगदान देणार्‍या पत्रकारांना ही सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष उदय कबुले, उपाध्यक्ष प्रदिप विधाते यांच्यासह विविध विषय समित्यांचे सभापती, जिल्हा परिषद सदस्य, मुख्य कार्यकारी अधिकारी, उप मुख्य कार्यकारी अधिकारी वगैरे सर्वांचे सहकार्य लाभले असल्याचे श्रीमंत संजीवराजे यांनी आवर्जून सांगितले.


Back to top button
Don`t copy text!