सातारा जिल्हा परिषद सभापती निवडीच्या वार्तांकनासाठी पत्रकारांना अखेर परवानगी; जिल्हाधिकारी संतोष पाटील यांचा निर्णय


सातारा जिल्हा परिषदेच्या ४ एप्रिल रोजी होणाऱ्या सर्वसाधारण सभेसाठी व विषय समिती सभापती निवडीसाठी अधिकृत पत्रकारांना उपस्थित राहून वार्तांकन करण्यास जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी रीतसर परवानगी दिली आहे.

स्थैर्य, सातारा, दि. ३ एप्रिल : सातारा जिल्हा परिषदेमध्ये उद्या, दि. ४ एप्रिल रोजी होणाऱ्या सर्वसाधारण सभेसाठी आणि विषय समिती सभापती निवडीसाठी अधिकृत पत्रकारांना उपस्थित राहून वार्तांकन करण्याची परवानगी जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिली आहे.

काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीवेळी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना वार्तांकनासाठी परवानगी नाकारण्यात आली होती. जिल्हा परिषदेच्या इतिहासात यापूर्वी माध्यमांना कधीही असा अटकाव केला गेला नसल्याने या प्रकारावरून मोठा वादंग निर्माण झाला होता. यासंदर्भात पुणे विभागीय अधिस्विकृती समितीचे अध्यक्ष व सातारा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष हरीष पाटणे, तसेच सातारा पत्रकार संघाच्या वतीने जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्याकडे फोनवरून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली होती.

“सभापतीपदांच्या निवडीवेळी तरी पत्रकारांना वार्तांकनासाठी परवानगी मिळालीच पाहिजे,” अशी ठाम भूमिका हरीष पाटणे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे मांडली होती. तसेच, पाटणे यांच्या सूचनेनुसार सातारा पत्रकार संघाने रीतसर परवानगीचे पत्रही जिल्हाधिकाऱ्यांना पाठवले होते.

सातारा पत्रकार संघाच्या या पत्राची आणि मागणीची तात्काळ दखल घेत जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी उद्या (दि. ४ एप्रिल) होणाऱ्या सभापती निवडीच्या वेळी माध्यमांना वार्तांकन करण्यास अधिकृत परवानगी दिली आहे. या निर्णयाचे पत्रकारांमधून स्वागत होत असून, साताऱ्यातील सर्व पत्रकारांनी प्रशासनाच्या नियमांचे पालन करून या सभेचे वार्तांकन करावे, असे आवाहन सातारा पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आले आहे.


Back to top button
Don`t copy text!