पत्रकार प्रशांत रणवरे यांना वाळू माफियांकडून जीवे मारण्याची धमकी; पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल न झाल्यास पत्रकारांचा उपोषणाचा इशारा

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, फलटण, दि.२१: जिंती गावचे पत्रकार प्रशांत रणवरे यांना वाळू माफियानी जीवे मारण्याची धमकी व शिविगाळ करण्याचा प्रकार घडला असून या प्रकरणी आरोपी विरोधात पत्रकार संरक्षण कायद्याच्या अंतर्गत गुन्हा दाखल न केल्याच्या निषेधार्थ फलटण तालुक्यातील पत्रकारांनी एकत्र येत सदर घटनेचा निषेध करुन गुन्हा दाखल न झाल्यास उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.

याबाबतची सविस्तर माहिती अशी की, जिंती गावचे पत्रकार प्रशांत रणवरे हे वार्तांकनाच्या कामासाठी गेेले असता त्यानंतर ते जिंती गावाच्या बस स्टँडवर थांबले होते. त्यावेळी प्रमोद रणवरे व इतर दोन वाळू माफियानी, ‘‘तू महसूल कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांना वाळू उपसाची माहीती देतो असे मला त्यांनी सांगितले आहे’’ असे म्हणत जीवे मारण्याची धमकी व शिविगाळ केल्याची घटना घडली. त्यानंतर पत्रकार प्रशांत रणवरे ग्रामीण पोलिस ठाण्यात गेले असता पोलिस कर्मचारी यांनी पत्रकार संरक्षण कायद्याच्या अंतर्गत गुन्हा दाखल न करता फक्त अदखलपात्र गुन्हा दाखल केला. या घटनेची माहिती मिळताच जिल्ह्यासह तालुक्यातील पत्रकार यांनी याप्रकरणी आक्रमक भूमिका घेत वाळू माफिया यांना चुकीची माहिती देणार्‍या जबाबदार महसूल अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कारवाई करण्याची व पत्रकार संरक्षण कायद्याच्या अंतर्गत वाळू माफियांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची जोरदार मागणी केली.

यानंतर फलटण शहर व तालुका पत्रकारांनी एकत्रित येवून या घटनेचा निषेध करून फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात संबंधित आरोपीच्या विरोधात पत्रकार संरक्षण कायद्याच्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. फलटण ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक नितीन सावंत यांना पत्रकार संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी जाब विचारत आरोपीला कोणत्या महसूल अधिकारी व कर्मचारी यांनी पत्रकार रणवरे यांच्याबाबत वाळू माफियांना चुकीची माहिती दिली याची चौकशी करण्याची मागणी करुन रणवरे यांना धमकावणार्‍यांवर पत्रकार संरक्षण कायद्याच्या अंतर्गत गुन्हा दाखल न झाल्यास मंगळवार दिनांक 22 रोजी उपोषण सुरू करण्याचा इशारा दिला. पोलिसांनी याप्रकरणी कठोर कारवाई न केल्यास पत्रकारांच्या रोषाला समोर जावे लागेल असेही यावेळी पत्रकारांच्यावतीने स्पष्ट करण्यात आले.

विविध विभागातील अनेक अधिकारी व कर्मचारी बेकायदेशीर अवैध धंदे, वाळू माफिया, जुगार, मटका, दारू विक्री करणार्‍या व्यक्तींना पत्रकारांचे नाव पुढे करुन कारवाईची भिती दाखवत आर्थिक मागणी करत असल्याची बाब समोर येत असल्याचे यावेळी बैठकीत निदर्शनास आणून दिले. यापुढे असे घडल्यास अशा अधिकारी, कर्मचार्‍यांना जशासतसे उत्तर दिले जाईल, असा इशाराही पत्रकारांच्यावतीने यावेळी देण्यात आला.

यावेळी ज्येष्ठ पत्रकार रवींद्र बेडकिहाळ, अरविंद मेहता, रमेश आढाव, सुभाष भांबुरे, राजेंद्र भागवत, नसीर शिकलगार, अजय माळवे, दादासाहेब चोरमले, यशवत खलाटे, बाळासाहेब ननावरे, बापूराव जगताप, प्रकाश सस्ते, संजय जामदार, युवराज पवार, शक्ती भोसले, विक्रम चोरमले, चैतन्य रुद्रभटे, प्रसन्न रुद्रभटे, दीपक मदने, विकास अहिवळे, राजकुमार गोफणे, अमोल नाळे, प्रवीण काकडे, उमेश गार्डे, शेखर जगताप, अमिरभाई शेख, उद्धव बोराटे, विठ्ठल शिंदे, संजय गायकवाड आदींची उपस्थित होती.

ना.शंभूराज देसाईंनी दिल्या वाळू माफियावर कारवाईच्या सूचना

गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी याप्रकरणी पोलिस अधिकार्‍यांना मुजोर वाळू माफियावर कडक कारवाई करण्याची सूचना दिली असून फलटण तालुक्यासह संपूर्ण सातारा जिल्ह्यातील पत्रकारांच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभे असल्याचे सांगितले.

जिल्ह्यातील पत्रकार फलटणच्या पत्रकारांच्या पाठीशी : हरिष पाटणे

फलटण तालुक्यातील जिंती येथील प्रशांत रणवरे या आमच्या पत्रकार बांधवाला जिवे मारण्याची जी धमकी दिली गेलेली आहे. या बाबतीत पोलीस प्रशासनाने सबंधित आरोपीवर तातडीने कारवाई करावी. या बाबतीत फलटणचे पत्रकार जी भुमिका घेतील, त्यांच्या पाठीमागे संपूर्ण जिल्ह्यातील पत्रकार बंधू ठामपणे उभे राहतील, असे सातारा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिष पाटणे यांनी स्पष्ट केले आहे.

महसूल व पोलीस प्रशासनाबरोबर असहकार आंदोलन : प्रा.रमेश आढाव

महसुल पोलिस आणि वाळु उपसा करणारे वळू यांच्यात परस्पर संबध असतात हे पत्रकारांनी अनेकदा उघडकीस आणले आहे. पत्रकारांना तोंडावर गोड आणि पाठीमागे वाईट बोलण्याची महसूल व पोलिस प्रशासनाची अनेक वर्षाची घाणेरडी परंपराच आहे. याचे गांभीर्य लक्षात घेवुन शहर व तालुक्यातील सर्व पत्रकार, विविध साप्ताहिकांचे संपादक यापुढे महसूल व पोलिस प्रशासनाबरोबर असहकार आंदोलन करणार असल्याचे, ज्येष्ठ पत्रकार प्रा.रमेश आढाव यांनी सांगितले.


Back to top button
Don`t copy text!