
स्थैर्य, औंध, दि.१५: चोराडे येथील पत्रकार राजीव पिसाळ यांना त्याच गावातील तानाजी रघुनाथ पिसाळ याने शिवीगाळ,अर्वाच्य भाषेत दमदाटी,व जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी औंध पोलीस ठाण्यात महाराष्ट्र प्रसार माध्यम व्यक्ती आणि प्रसार माध्यम संस्था,हिंसकरीत्या नुकसान किंवा हानी प्रतिबंध अधिनियम २०१७ कलम ३,४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस स्टेशनमधून मिळालेली माहिती अशी की,चोराडे येथे बैलगाडी अड्डा चोरीछुपे राजीव पिसाळ यांच्या शेताशेजारी सुरू होत्या,रघुनाथ पिसाळ यांचे घर व जमीन तिथेच आहे,३० सप्टेंबर रोजी राजीव पिसाळ हे कुरण मळा नावाच्या त्यांच्या शेतात गेले असता,पोलीसानी तिथे बैलगाडीचा ट्रॅक नांगरला होता,त्यामुळे शर्यती बंद पडल्या.दि.१२ ऑक्टोबर रोजी राजीव पिसाळ हे आपल्या घरासमोर श्रीराज दूध डेअरी येथे रात्री साडेआठच्या सुमारास रामचंद्र पिसाळ व नवनाथ पिसाळ यांच्याशी बोलत थांबले होते, त्याचवेळी रघुनाथ पिसाळ याने अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत कॉलर धरून हातात चाकूसारखी दिसणारी वस्तू दाखवत ‘तुला मस्ती आली आहे,तूच बैलगाडी शर्यती बंद पाडल्या’तुझी पत्रकारिता माझेवर दाखवतोस का ? यापुढे असे केले तर तुला जिवंत ठेवणार नाही असे म्हणत राजीव पिसाळ याना ढकलून दिले.
याबाबत औंध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश देशमुख व सपोनि उत्तम भापकर करीत आहेत.दरम्यान या घटनेचा पत्रकार बांधवांनी तीव्र निषेध व्यक्त केला आहे, तसेच गृहमंत्री,जिल्हाधिकारी,उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्याकडे पत्रकार संघटनेने लेखी निवेदनाद्वारे दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.