दैनिक स्थैर्य | दि. १५ ऑगस्ट २०२३ | फलटण |
जागतिक अस्थिरोग दिनानिमित्त जोशी हॉस्पिटल प्रा. लि. तर्फे दि. १५ ऑक्टोबर २०२३ रोजी फलटण येथे मॅरेथॉनचे आयोजन केले आहे.
जोशी हॉस्पिटल प्रा. लि. आणि ट्रामा सेंटर, फलटणच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे जागतिक अस्थिरोग दिनानिमित्त मॅरेथॉनचे आयोजन रविवार, दि. १५ ऑक्टोबर रोजी सकाळी ६.०० वाजता सजाई गार्डन मंगल कार्यालय, फलटण येथे करण्यात येत असल्याचे निमंत्रक डॉ. प्रसाद जोशी व डॉ. सौ. प्राची जोशी यांनी पत्रकाद्वारे सांगितले आहे.
जागतिक अस्थिरोग दिनानिमित्त जोशी हॉस्पिटल गेल्या ७ वर्षांपासून अनोख्या व आगळ्या वेगळ्या पध्दतीने हा दिन साजरा करत आहे. कोरोना महामारीमुळे मधील दोन वर्षे कुठलेच कार्यक्रम घेता आले नाहीत. त्यामुळे यावर्षी अधिक जोमाने हा कार्यक्रम आपण सर्वांनी मिळून साजरा करूयात, असे डॉ. प्रसाद जोशी यांनी आवाहन केले आहे.
मानवी जीवन आनंदी व समाधानी असावे, त्यासाठी निरोगी मनाची आणि निरोगी मनाच्या वास्तव्यासाठी निरोगी शरीराची आवश्यकता असते. शरीर निरोगी ठेवण्यात आहार व व्यायाम यांचा मुख्य वाटा असून देशाच्या जडणघडणीत युवकांचे योगदान महत्त्वाचे असल्याने युवा पिढीला समजावून घेवून त्यांच्याशी सुसंवाद प्रस्थापित करणे, हे सामाजिक कर्तव्य असून जागतिक अस्थिरोग दिनानिमित्त आयोजित मॅरेथॉन कार्यक्रम हा त्यादृष्टीने खारीचा वाटा असल्याचे डॉ. प्रसाद जोशी यांनी स्पष्ट केले.
२५ ते ७५ वर्षे वयोगटातील सर्वाना व्यायामाचे महत्त्व समजावून देणे व प्रबोधन करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते.
गेल्या २३ वर्षांपासून फलटण येथे कार्यरत असताना अस्थिरोग उपचार, सांधेरोपण शस्त्रक्रिया आणि मणक्यांवरील शस्त्रक्रिया करून अविरत उपचार देणे चालूच आहे. सदरचे पेशंट आमच्या कुटुंबाचा एक भाग असल्याने सर्वांनी एकत्र येवून दि. १५ ऑक्टोबर रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असून या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन डॉ. प्रसाद जोशी यांनी सर्वांना केले आहे.
दि. १५ ऑक्टोबर रोजी सकाळी ६.०० वाजता सजाई गार्डन, फलटण येथून १५ कि.मी. मॅरेथॉनची सुरुवात होणार आहे. त्यानंतर सकाळी ६.३० वाजता सजाई गार्डन येथून १० कि. मी. मॅरेथॉन स्पर्धेची सुरुवात होणार आहे. नंतर सकाळी ७.०० वाजता ५ कि. मी. मॅरेथॉनची स्पर्धा सुरू होईल.
सकाळी ७.३० वाजता ३ कि.मी. ज्येष्ठांसाठीची ‘वाकेथॉन’ सुरू होणार आहे. त्यानंतर सकाळी ८ वाजता ‘रोबोटिक’ तंत्रज्ञानाची केलेल्या पहिल्या ५० पेशंटची अनोखी १.५ कि.मी.चालण्याची परेड आपल्याला पाहायला मिळणार आहे.
मॅरेथॉन पूर्ण केल्यावर प्रत्येकाला एक ‘फिनिशल मेडल’ मिळणार आहे. त्यानंतर भरपेट नाष्ट्याची सोय केली आहे.
१०.३० वाजता मुख्य कार्यक्रमा मध्ये मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वाटप केले जाईल.
‘सजाई गार्डन’ कार्यालयामधील कार्यक्रमासाठी प्रवेश पास आवश्यक असल्याचे डॉ. जोशी यांनी सांगितले.
मॅरेथॉनमध्ये सहभागी होण्यासाठी दि. ३० सप्टेंबरपर्यंत ऑनलाईन नोंदणी joshihospitalpvtltd.com या वेबसाईटवर करता येणार आहे. प्रवेश शुल्क रू. ५००/- फक्त आहे, जे की ऑनलाईन ‘पे’ करायचे आहे.
३ कि.मी. मध्ये भाग घेणार्या ज्येष्ठ नागरिकांना कोणतीही फी आकारली जाणार नसल्याचे निमंत्रक डॉ. प्रसाद जोशी व डॉ. सौ. प्राची जोशी यांनी सांगितले.
दि. १२, १३ आणि १४ ऑक्टोबर या तीनही तारखेला सकाळी १०.०० ते दुपारी ५.०० या वेळेत मॅरेथॉनचे किट घेऊन जावे, की ज्यामध्ये टी-शर्ट, रनर बिब, टोपी आणि एक आकर्षक गिफ्ट मिळेल.
या स्पर्धेचा सर्वांनी लाभ घ्यावा आणि जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जोशी हॉस्पिटल प्रा. लि., फलटणतर्फे करण्यात आले आहे.
‘आपली फलटण मॅरेथॉन २०२३’ स्पर्धेचे गट खालीलप्रमाणे –
१. १८ ते ३० (स्त्री/पुरूष) – जोश पूर्ण युवा गट
२. ३१ ते ४५ (स्त्री/पुरूष) – सळसळती तरुणाई
३. ४६ ते ६४ (स्त्री/पुरूष) – प्रगल्भ प्रौढ
४. ६५ आणि त्यावरील (स्त्री/पुरूष) – अनुभवी ज्येष्ठ
पहिले तीन गट हे ५ कि.मी., १० कि.मी. आणि १५ कि.मी.च्या मॅरेथॉनमध्ये आपल्या क्षमतेनुसार भाग घेऊ शकतात.
चौथा गट हा फक्त ३ कि.मी. ‘वॉकेथॉन’साठीच आहे. (या गटाला रजिस्ट्रेशन फी माफ आहे).
प्रत्येकाला मॅरेथॉन पूर्ण केल्याचे ‘मेडल’ दिले जाणार आहे. ‘ई-सर्टिफिकेट’ही दिले जाईल. प्रत्येक गटात पुरूष/महिला प्रत्येकी पहिल्या येणार्या तिघांना बक्षीस दिले जाणार आहे.
रजिस्ट्रेशन ऑनलाईन joshihospitalpvtltd.com वेबसाईटवर करावे. रजिस्ट्रेशन फी रू. ५०० /- फक्त असून शेवटची रजिस्ट्रेशन दिनांक ३० सप्टेंबर २०२३ आहे, अशी माहिती डॉ. प्रसाद जोशी आणि डॉ. प्राची जोशी आणि जोशी हॉस्पिटल परिवाराने दिली आहे.