दैनिक स्थैर्य । दि. १९ डिसेंबर २०२२ । फलटण । पुणे मुंबई येथील कार्पोरेट हॉस्पिटल पेक्षा उत्तम, अत्याधुनिक वैद्यकीय साधने सुविधा आणि तज्ञ डॉक्टर्स सह सुसज्ज असलेल्या जोशी हॉस्पिटल प्रा. लि., फलटण येथे पुणे मुंबईत होत असलेले वैद्यकिय उपचार आणि शस्त्रक्रिया येथे तालुका स्तरावर होतात ही आनंदाची आणि अभिमानास्पद बाब असल्याचे निष्णात अस्थिरोग तज्ञ डॉ. जी. एस. कुलकर्णी यांनी स्पष्ट केले.
जोशी हॉस्पिटल प्रा. लि., फलटणच्या विस्तारित इमारत व अस्थिरोग उपचार क्षेत्रातील अत्याधुनिक साधने सुविधांनी सुसज्ज रुग्णालयाचे उद्घाटन डॉ. जी. एस. कुलकर्णी, मिरज यांच्या हस्ते समारंभपूर्वक संपन्न झाले. यावेळी खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर, श्रीमंत सुभद्राराजे नाईक निंबाळकर, महाराष्ट्र खो – खो असोसिएशनचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते सुभाषराव शिंदे, सातारा जिल्हा परिषद माजी सदस्य प्रल्हादराव साळुंखे पाटील व प्रा. बंडा गोडसे, जिल्हा परिषद महिला बाल कल्याण समितीच्या माजी अध्यक्षा व जय भवानी एज्युकेशन सोसायटीच्या सेक्रेटरी श्रीमती शारदादेवी कदम, श्रीमती जयश्री जोशी, सद्गुरु व महाराजा संस्था समुहाचे संस्थापक दिलीपसिंह भोसले, स्वयंसिद्धा महिला संस्था समुहाच्या प्रमुख ॲड. सौ. मधुबाला भोसले, श्रीराम एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी डॉ. सचिन सूर्यवंशी बेडके, ज्येष्ठ पत्रकार रविंद्र बेडकिहाळ, प्रा. रमेश आढाव, अरविंद मेहता विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते.
डॉ. जोशी दाम्पत्य फलटण करांना परमेश्वराने दिलेली अनमोल देणगी
तालुका स्तरावर जोशी हॉस्पिटल प्रा. लि., फलटण हे स्वच्छ, सुसज्ज आणि नावीन्यपूर्ण हॉस्पिटल आपण प्रथम पहात असल्याचे सांगत सर्वसामान्य मध्यमवर्गीय आणि गरिबांच्या खिशाला परवडेल अशा अल्प मोबदल्यात दर्जेदार वैद्यकिय उपचार करणारे जोशी हॉस्पिटल आणि डॉ. जोशी दाम्पत्य म्हणजे फलटण करांना परमेश्वराने दिलेली अनमोल देणगी असल्याचे नमूद करीत डॉ. जी. एस. कुलकर्णी यांनी सदिच्छा व्यक्त केल्या.
जबाबदारी विभागण्याची आवश्यकता
तालुकास्तरावरील या हॉस्पिटल मध्ये ३५०० सांधे रोपण आणि २० हजारावर हाडांच्या अन्य शस्त्रक्रिया हे खूप काम झाले आणि ते एकट्याने करताना डॉ. प्रसाद जोशी यांना अभ्यास, वाचन यासाठी पुरेसा वेळ मिळणे कठीण होत असल्याने नवीन संशोधन किंवा या क्षेत्रातील अभ्यास यासाठी या हॉस्पिटल मध्ये मदतीला आणखी काही तज्ञ डॉक्टर मंडळी बरोबर घेऊन जबाबदारी विभागण्याची आवश्यकता डॉ. कुलकर्णी यांनी स्पष्ट पणे नमूद केली.
समाजाचे नुकसान करणारे प्रकार थांबले पाहिजेत
उपचार सुरु असताना एकादा रुग्ण दगावतो त्यामध्ये उपचार करणाऱ्या डॉक्टरांचा दोष नसला तरी त्यांच्यावर आरोप करुन हॉस्पिटलची मोडतोड, डॉक्टरांवर हल्ले होतात, हे गैरसमजातून घडते अलीकडे असे प्रकार वारंवार होत असल्याने आज कोणीही डॉक्टर किंवा हॉस्पिटल अत्यवस्थ रुग्ण दाखल करुन घेण्यास तयार होत नाहीत त्यातून समाजाचे नुकसान होत असल्याचे निदर्शनास आणून देत असे प्रकार थांबले पाहिजेत अशी अपेक्षा डॉ. कुलकर्णी यांनी व्यक्त केली.
व्यायाम व आहारावर नियंत्रण आवश्यक
डॉ. कुलकर्णी यांनी सशक्त, सुदृढ व निरोगी आरोग्यासाठी उत्तम मार्गदर्शन करताना आहार, विहार, व्यायाम याविषयी काही सूचना करताना तळलेले व गोड पदार्थ वर्ज्य करा, फळे, भाज्या विशेषत: कच्च्या भाज्या, काकडी, कोशिंबीर आहारात अधिक असावी, व्यायाम, प्राणायाम, सूर्य नमस्कार याला प्राधान्य देण्याचा सल्ला दिला, चालणे अधिक असावे असे आवर्जून सांगितले.
फलटण करामध्ये डॉ. जोशी यांच्या विषयी आपुलकी, प्रेम
जोशी हॉस्पिटल प्रा. लि., फलटणच्या नुतनीकरण उद्घाटन प्रसंगी सर्व राजकीय पक्षांचे, विविध क्षेत्रातील विविध विचार धारेची मंडळी एकत्र आहेत यावरुन फलटण करामध्ये डॉ. जोशी यांच्या विषयी असलेली आपुलकी, प्रेम स्पष्ट होत असल्याचे नमूद करीत खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी डॉ. प्रसाद जोशी यांच्या कौशल्य पूर्ण दर्जेदार वैद्यकिय सेवेचे कौतुक केले.
डॉ. प्रसाद जोशी यांनी हे शिवधनुष्य लीलया पेलले
मेट्रो सिटी प्रमाणे अत्याधुनिक साधने सुविधांनी सुसज्ज दर्जेदार हॉस्पिटल तालुका स्तरावर उभे करुन ते सलग २०/२२ वर्षे रुग्णांना समाधान कारक सेवा, सुविधा देवून चालविणे कठीण आहे, परंतू डॉ. प्रसाद जोशी यांनी हे शिवधनुष्य लीलया पेलले असल्याचे नमूद करीत समाजातील रंजल्या गांजल्या, गरिबांना अशाच प्रकारे सेवा सुविधा देत रहा अशी अपेक्षा व्यक्त करीत त्यासाठी डॉ. जोशी यांना उदंड आयुष्य, सुख समाधान मिळावे अशी प्रार्थना खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी परमेश्र्वराकडे केली.
दर्जेदार सुश्रुषा आपल्या आरोग्य दायी जीवनाची दिशा हे सूत्र
प्रारंभी डॉ. प्रसाद जोशी यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत व प्रमुख पाहुण्यांचे सत्कार केल्यानंतर प्रास्ताविकात हॉस्पिटलच्या विस्तार वाढ व नवनवीन साधने सुविधांनी सुसज्ज हॉस्पिटल विषयी विवेचन केले.
दर्जेदार सुश्रुषा आपल्या आरोग्य दायी जीवनाची दिशा हे सूत्र स्वीकारुन गेली २२ वर्षे जोशी हॉस्पिटल प्रा. लि., फलटण मध्ये उपचार करताना निष्णात डॉक्टर्स, प्रशिक्षित कर्मचारी, अत्याधुनिक मशिनरी, साधने, सुविधा आणि स्वच्छता ही जबाबदारी स्वीकारुनच कार्यरत राहिलो यापुढेही त्यामध्ये खंड पडणार नसल्याची ग्वाही डॉ. प्रसाद जोशी यांनी दिली.
तडजोड न करता सतत दर्जेदार सेवा सुविधा उपलब्ध केल्या
४० बेडचे अत्याधुनिक आर्थोपेडीक स्पेशालिटी हॉस्पिटल तालुकास्तरावर चालविताना अनंत अडचणी आल्या तरी कोठेही तडजोड न करता सतत दर्जेदार सेवा सुविधा देत राहिल्याने २ राष्ट्रीय व २ राज्य स्तरीय पुरस्काराने या सेवेचा गौरव झाल्याचे निदर्शनास आणून देत आतापर्यंत आणि यापुढेही सतत समाजातील सर्व घटकांना शारिरीक, मानसिक, सामाजिक, अध्यात्मिक आरोग्य उत्तम प्रकारे लाभेल यासाठी सतत प्रयत्नशील राहण्याची ग्वाही डॉ. प्रसाद जोशी यांनी दिली.
प्रा. बंडा गोडसे, रणजित निंबाळकर यांनी हॉस्पिटल सेवेतील अनुभव सांगताना अत्यंत विनम्र व दर्जेदार वैद्यकिय सेवा लाभल्याचे नमूद करीत डॉ. जोशी यांना धन्यवाद दिले. चैतन्य रुद्र्भटे यांनी उत्तम चित्र फिती द्वारे डॉ. जोशी व त्यांच्या कुटुंबाचा आणि जोशी हॉस्पिटलचा परिचय अत्यंत उत्तम प्रकारे करुन दिला.
शासकीय अधिकाऱ्यांच्या शुभेच्छा
प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप, उप विभागीय पोलिस अधिकारी तानाजी बरडे, तहसीलदार समीर यादव, नगर परिषद मुख्याधिकारी संजय गायकवाड, परिविक्षाधीन प्रांताधिकारी दादासाहेब दराडे यांच्या सह शहर व तालुक्यातील शासकीय अधिकारी, कर्मचारी, विविध क्षेत्रातील मान्यवर आणि शहर वासीयानी डॉ. प्रसाद जोशी व डॉ. सौ. प्राची जोशी यांना शुभेच्छा देत त्यांचे अभिनंदन केले.
नवनाथ कोलवडकर यांनी सूत्र संचालन, डॉ. प्राची जोशी यांनी समारोप व आभार प्रदर्शन केले.