आगामी जयंती उत्सव अन् रस्त्यांची कामे: गैरसोय टाळण्यासाठी फलटणमध्ये PWD आणि उत्सव समित्यांची संयुक्त बैठक संपन्न!


फलटणमध्ये आगामी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती आणि भगवान महावीर जन्मकल्याणक जयंतीच्या अनुषंगाने, शहरातील सुरू असलेल्या पालखी मार्गाच्या कामात समतोल राखण्यासाठी आणि नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.

स्थैर्य, फलटण, दि. 5 मार्च : आगामी काळात साजऱ्या होणाऱ्या महापुरुषांच्या जयंती उत्सवांना गालबोट लागू नये आणि शहरातील सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामांमुळे नागरिकांची व मिरवणुकांची कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी फलटणमध्ये आज (बुधवार, दि. ४ मार्च २०२६) एक अत्यंत महत्त्वपूर्ण समन्वय बैठक पार पडली.

फलटण नगरपरिषदेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर आणि उपनगराध्यक्षा सौ. प्रियदर्शनी रणजितसिंह भोसले यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली ही बैठक आयोजित करण्यात आली होती.

रस्त्यांची कामे आणि उत्सवांचा समतोल राखण्यावर चर्चा

या बैठकीत ‘परमपूज्य भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव कमिटी’, ‘श्री १००८ भगवान महावीर जन्मकल्याणक जयंती महोत्सव कमिटी’ आणि ‘सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) सातारा, जिल्हा उपविभाग फलटण’ यांचे प्रमुख पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते.

सध्या फलटण शहरातून जाणाऱ्या पालखी मार्गाचे आणि इतर रस्त्यांचे काम वेगात सुरू आहे. आगामी जयंती उत्सवांच्या काळात या सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामांमुळे उत्सवात कोणतेही अडथळे येऊ नयेत आणि नागरिकांना वाहतुकीची किंवा इतर कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी विकासकामे व उत्सव या दोन्ही गोष्टींचा योग्य समतोल कसा राखता येईल, यावर या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. उत्सवाच्या मार्गावरील अडथळे वेळेत दूर करण्याबाबत बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना देण्यात आल्या.

बैठकीला ‘या’ मान्यवरांची प्रमुख उपस्थिती:

या महत्त्वपूर्ण संयुक्त बैठकीला खालील अधिकारी आणि पदाधिकारी उपस्थित होते:

  • रवीकुमार आंबेकर (डेप्युटी इंजिनिअर, PWD)

  • साबळे (ज्युनिअर इंजिनिअर, PWD)

  • प्रफुल्ल पाटील (प्रोजेक्ट मॅनेजर, पालखी मार्ग)

  • सौ. सुपर्णा सनी अहिवळे (सभापती, मागासवर्गीय दुर्बल घटक कल्याणकारी समिती तथा नगरसेविका)

  • सौ. मीना काकडे (नगरसेविका)

  • अमोल सस्ते (भाजपाचे माजी शहराध्यक्ष)

  • हरीश (आप्पा) काकडे (अध्यक्ष, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव कमिटी)

  • सागर दोशी (अध्यक्ष, भगवान महावीर जयंती महोत्सव कमिटी)

  • राजूशेठ वाकडमाने, निलेशशेठ दोशी, पंकजशेठ दोशी (डीजी कंपनी) यांसारखे प्रतिष्ठित व्यापारी आणि नागरिक.

शहराच्या विकासाबरोबरच सामाजिक आणि धार्मिक उत्सवांनाही तितकेच महत्त्व देत, प्रशासनाने उत्सवांपूर्वीच घेतलेल्या या समन्वय बैठकीचे नागरिकांमधून स्वागत होत आहे.


Back to top button
Don`t copy text!