स्थैर्य, कोरेगाव, दि.१६: कोरोनाची साखळी तोडण्यासाठी शहरात करण्यात आलेल्या जनता कर्फ्युनंतर बुधवारी बाजारपेठ उघडताच नगरपंचायत आणि पोलिसांनी शहरात संयुक्त कारवाई करत सोशल डिस्टेन्सिंग, मास्कचा आणि सॅनिटायझरचा वापर न करणार्या व्यापारी आस्थापनांवर दंडात्मक कारवाई केली. दिवसभरामध्ये सात हजार रुपयांचा दंड वसूल झाला.
कोरेगाव शहरातून कोरोना हद्दपार करण्यासाठी लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि अधिकार्यांनी कंबर कसली असून, सामाजिक कार्यकर्त्यांना बरोबर घेत आराखडा तयार केला आहे. आठ दिवस जनता कर्फ्युनंतर आज बाजारपेठेत सर्व व्यवहार सुरळीत सुरु झाले, मात्र प्रचंड प्रमाणात गर्दी झाली होती.
नगराध्यक्षा सौ. रेश्मा संतोष कोकरे, उपनगराध्यक्षा सौ. संगीता नवनाथ बर्गे, मुख्याधिकारी विजया घाडगे, पोलीस निरीक्षक सुनील गोडसे, उपनिरीक्षक विशाल कदम, वाहतूक नियंत्रण शाखेचे कर्मचारी, पोलीस कर्मचारी, होमगार्डस, नगरपंचायतीचे कर्मचारी यांनी जुना मोटार स्टँड येथून दंडात्मक कारवाईस सुरुवात केली. शासनाने केलेल्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी व्यापारी आस्थापनेकडून प्रत्येकी पाचशे रुपये दंड वसूल करण्यात आला. मास्कचा वापर न करता, दुचाकी आणि चार चाकी वाहने चालविणार्यांवर देखील वाहतूक पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली.