स्थैर्य, वॉशिंग्टन, दि.८ : संपूर्ण जगाचे लक्ष लागून असलेल्या अमेरिका राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीचे निकाल जाहीर झाले असून डेमोक्रॅटीक पक्षाचे उमेदवार जो बायडन हे अमेरिकेचे ४६वे राष्ट्राध्यक्ष होणार आहेत. अमेरिकेचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा त्यांनी पराभव केला आहे. बायडन यांना २८४ तर ट्रम्प यांना २१४ इतकी इलेक्टोरल मते मिळाली.
अमेरिका राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत बायडन विक्रमी मतांनी विजयी झाले आहेत. बायडन यांना सात कोटींहून अधिक मते मिळाली. बायडन यांच्या विजयामुळे अमेरिकेच्या उपराष्ट्रपतीपदी कमला हॅरीस यांनी निवड होणार आहे. आफ्रो-अमेरिकन वंशाच्या कमला हॅरीस आता अमेरिकेच्या पहिल्या महिला उपराष्ट्रपती असणार आहेत.
दरम्यान मतमोजणीच्या मुद्यावरून ट्रम्प यांनी कोर्टात जाण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे अमेरिकेतील सत्ता संघर्षाचा पुढील अंक कोर्टात रंगण्याची चिन्हं आहेत.