
स्थैर्य, कोळकी, दि. २४ ऑगस्ट : कोळकी (ता. फलटण) येथे सुरू असलेल्या ‘जिंगो सर्कस’मध्ये नागरिकांच्या सुरक्षेसाठी कोणतीही उपाययोजना नसल्याचा गंभीर आरोप करत, या सर्कशीच्या सर्व परवानग्या तपासण्याची मागणी एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. कोळकी येथील नागरिक धर्मराज देशपांडे यांनी प्रांताधिकारी, तहसीलदार आणि पोलीस निरीक्षक यांना हे निवेदन दिले असून, नियमांचे उल्लंघन झाले असल्यास सर्कस मालकावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
धर्मराज देशपांडे यांनी दिलेल्या निवेदनानुसार, कोळकी येथे मनोरंजनासाठी आलेल्या या सर्कसमध्ये सुरक्षेच्या नियमांची सर्रास पायमल्ली होत आहे. सर्कसच्या ठिकाणी आग लागल्यास ती विझवण्यासाठी अग्निशमन दलाची गाडी किंवा साधे अग्निरोधक सिलेंडरही उपलब्ध नाहीत. तसेच, खेळ पाहताना कोणाला इजा झाल्यास तातडीच्या वैद्यकीय उपचारांसाठी रुग्णवाहिकेची (ॲम्बुलन्स) सोय देखील नाही.
एखाद्या मोठ्या कार्यक्रमाला किंवा गर्दीच्या ठिकाणी कायद्यानुसार अशा प्रकारची सुरक्षा व्यवस्था असणे बंधनकारक आहे. त्यामुळे, या सर्कसने पोलीस स्टेशन, तहसील कार्यालय आणि स्थानिक कोळकी ग्रामपंचायत यांच्याकडून आवश्यक असलेल्या सर्व परवानग्या घेतल्या आहेत का, याची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
जर सर्कस मालकाने परवानगीच्या अटी व शर्तींचे पालन केले नसेल, तर गर्दीच्या ठिकाणी नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण केल्याप्रकरणी त्यांच्यावर कायद्याचे उल्लंघन केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात यावा, असेही देशपांडे यांनी म्हटले आहे. या निवेदनावर तातडीने कार्यवाही करून योग्य ती तपासणी करावी, अशी विनंती कोळकी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली आहे.