केंद्र शासनाचा उत्कृष्ट जिल्हा कौशल्य विकास आराखडा पुरस्कार सातारा जिल्ह्याला जाहीर

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २४ मे २०२२ । सातारा । केंद्र शासनाच्या कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालय आयोजित जिल्हा कौशल्य विकास आराखडा स्पर्धेत सातारा जिल्ह्याला 2020-2021 चा उत्कृष्ट जिल्हा कौशल्य विकास आराखडा पुरस्कार जाहीर झाला आहे. या स्पर्धेचा पुरस्कार वितरण सोहळा 9 जून 2022 रोजी दिल्ली येथील डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय सेंटर येथे केंद्रीय कौशल्य विकास व उद्योजकता मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते होणार आहे. हा पुरसकार स्वीकारण्यासाठी जिल्हाधिकारी शेखर सिंह, जिल्हा कौशल्य विकास व उद्योजकता विभागाचे सहायक आयुक्त सुनील पवार यांना पुरस्करासाठी आमंत्रित करण्यात आले आहे.

केंद्र शासनाच्या कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालयाद्वारे घेण्यात आलेल्या जिल्हा कौशल्य विकास नियोजनातील उत्कृष्टतेसाठी 2020-2021 पुरस्कार स्पर्धेत सातारासह देशातील 336 जिल्ह्यांनी सहभाग घेऊन आराखडा सादर केला होता. त्यातून प्राथमिक स्तरावर 30 जिल्ह्यांची केंद्रीय समितीसमोर सादरीकरणासाठी निवड झाली होती व त्यामध्ये महाराष्ट्रातून सातारा जिल्ह्याच्या कौशल्य विकास कृती आराखड्याचा समावेश होता. जिल्हाधिकारी शेखर सिंह आणि जिल्हा कौशल्य विकास व उद्योजकता विभागाचे सहायक आयुक्त सुनील पवार व सहकारी यांनी या आराखड्याचे 19 जानेवारी 2022 रोजी केंद्रीय समितीसमोर ऑनलाईन सादरीकरण केले होते.

2020-2021 च्या आराखड्यात विशेष कामगिरी म्हणजे कोविड-19 च्या साथीमध्ये आरोग्य क्षेत्रात कुशल मनुष्यबळाचा अभाव दूर करण्याकरिता विभागाने मुख्यमंत्री महा आरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम, कस्टमाईज क्रॅश कोर्स फॉर कोविड वॉरिअर्स, संकल्प अंतर्गत 1 हजार 35 उमेदवारांना ॲडव्हान्स ॲन्ड बेसिक हेल्थकेअर सपोर्ट, जनरल ड्युटी असीस्टंट व ऑक्सिजन प्लॅट मेंटेनन्‌स या कोर्सचे प्रशिक्षण  जिल्ह्यातील 17 नामांकित हॉस्पिटलद्वारे देण्यात आले. तसेच कोविड काळात युवक-युवतींना रोजगार मिळवून देण्याकरिता 5 ऑनलाईन रोजगार मेळावे घेण्यात आले व त्यातून 1 हजार 54 उमेदवारांची प्राथमिक व अंतिम निवड झाली. या बरोबर विविध विषयांवर ऑनलाईन समुपदेशन व मार्गदर्शनाचे 15 कार्यक्रम आयोजित केले गेले. कोविड काळात कुटुंबातील सदस्य गमावलेल्या 17 इच्छुक उमेदवारांना (मृत व्यक्तीची विधवा, मुले, मुली) यांना प्राधान्य देऊन कौशल्य प्रशिक्षण देण्याचे काम देखील चालू आहे जेणेकरुन त्यांना रोजगार मिळविण्यासाठी सहाय्य होईल. तसेच आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून स्वयंरोजगार करु इच्छिणाऱ्या 238 उमेदवारांना आर्थिक सहाय्य करण्यात आले. तसेच प्रशिक्षणासाठी विविध क्षेत्रातील दर्जेदार संस्थाची स्कील इंडिया पोर्टलवर नोंदणी करण्यात आली .

सातारा जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राकडून राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांच्या माध्यमातून जिल्ह्यातील मनुष्यबळाची मागणी असलेल्या क्षेत्रात कौशल्य आधिारित प्रशिक्षण देऊन रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करुन दिल्या जातात. या अनुषंगाने जिल्ह्यातील विशिष्ट भौगोलिक तथा समाजिक स्थिती, परंपरागत व्यवसाय, नैसर्गिक संसाधने तथा साधनसामुग्री इत्यादींच्या आधारे जिल्ह्यातील रोजगार, स्वयंरोजगारासाठी अधिक मागणी असलेली क्षेत्रे निश्चित करुन सातारा जिल्ह्याचा वार्षिक कृती आराखडा हा जिल्हाधिकारी  यांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात येतो.


Back to top button
Don`t copy text!